भाजप पदाधिकाऱ्यांविरूद्ध भाजपचे ‘धरणे’, यशवंत सहकारी बँक गैरव्यवहाराची चौकशी करा

फलटण येथील यशवंत सहकारी बँकेत मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱयांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली. या बँकेत सुमारे 112 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

भाजपचे प्रवक्ता, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन करून मनमानी कारभार केला. शेखर चरेगांवकर व त्यांच्या भावांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता, निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शेखर चरेगांवकर यांचा भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कोणताही संबंध नसताना त्यांना सहकार परिषदेवर स्थान देऊन राज्यमंत्रिपदाचा दर्जा कसा देण्यात आला, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. ज्या काळात शेखर चरेगांवकर यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, त्यावेळी विद्यमान मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सहकारमंत्री होते, असा उल्लेख निवेदनात आहे. दरम्यान, निदर्शने करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे, शेखर चरेगांवकर यांची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता राज्य शासनाने जप्त करावी, तसेच सध्या तुरुंगात असलेल्या त्यांच्या भावांना दिली जाणारी कथित ‘व्हीआयपी वागणूक’ बंद करून त्यांना सामान्य गुन्हेगारांप्रमाणे वागणूक द्यावी, अशी मागणी केली आहे.

चंद्रकांतदादांची ईडीमार्फत चौकशी करा

कराड येथील जनकल्याण पतसंस्थेचे कर्ज फेडण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी शेखर चरेगांवकर यांचा वापर केला. त्या बदल्यातच सहकार परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांची ईडीमार्फत चौकशी लावावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.