
राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत केंद्र सरकारने अनेक चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. भाजपसह सर्वच पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आणि पाठिंबाही दिला. चीनसंदर्भात केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा गाजावाजा भाजपने केला, मात्र अजून भाजपच्या कार्यालयातच बंदी घातलेल्या चीनी अॅपच्या मदतीने अनेक कामे सुरू असल्याचे काँग्रेसने निदर्शनास आणून दिले आहे. तसेच ट्वीटरवर पुरावे पोस्ट करून महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत हँडलला टॅग करण्यात आले आहेत. यावेळी भाजप गद्दार असल्याचा उल्लेख काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेला आहे.
जाहीर निषेध! गद्दार @BJP4Maharashtra मोदी सरकारने बंदी घातलेले #कॅमस्कॅनर अॅपचा अजूनही राजरोसपणे वापर करत आहे. चीनी अॅपवर बंदी आणि आत्मनिर्भर अभियान ही सर्व धूळफेक आहे. भाजपाचे चीनबद्दलचे प्रेम ओसंडून वाहणारे आहे हे स्पष्ट आहे. pic.twitter.com/9w0g5L0Im5
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 25, 2020
सचिन सावंत यांनी महाराष्ट्र भाजपने प्रसिद्ध केलेल्या एका यादीचा स्क्रीन शॉट आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘जाहीर निषेध! गद्दार @BJP4Maharashtra मोदी सरकारने बंदी घातलेले #कॅमस्कॅनर अॅपचा अजूनही राजरोसपणे वापर करत आहे. चीनी अॅपवर बंदी आणि आत्मनिर्भर अभियान ही सर्व धूळफेक आहे. भाजपाचे चीनबद्दलचे प्रेम ओसंडून वाहणारे आहे हे स्पष्ट आहे’, असे सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हिंदुस्थान-चीन सीमावाद अजूनही कायम असून आतापर्यंतच्या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. लडाखमध्ये चीनी सैनिकांनी हिंदुस्थानच्या जवानांवर हल्ला केला होता, ज्यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी म्हणून केंद्रातील मोदी सरकारने 59 अॅप्सवर बंदी घातली होती. यामध्ये शेअर इट, टिकटॉक, कॅमस्कॅनर यासारख्या अॅपचा समावेश आहे. देशातील नागरिकांनी देखील या निर्णयाचे स्वागत करत या अॅप्सचा वापर बंद केला होता. मात्र मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयाला भाजपकडूनच हरताळ फासण्यात येत असल्याने काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे.




























































