मी मास्क वापरणार, इतरांनीही वापरावे, भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांचे घूमजाव

मी मास्क घालत नाही, त्याने काय होतं? असे वक्तव्य करणे भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱया या वादग्रस्त वक्तव्यावरून टीका होऊ लागताच मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱया नरोत्तम मिश्रा यांनी ‘मी मास्क वापरणार, इतरांनीही वापरावे, असं म्हणत घूमजाव केले आहे.

मध्य प्रदेश सरकारमध्ये गृह मंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे नरोत्तम मिश्रा यांनी बुधवारी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मास्क घातला नव्हता. पत्रकारांनी त्यांना आपण मास्क का घातला नाही, अशी विचारणा केली असता, आपण अशा कार्यक्रमांमध्ये मास्क घालत नाही, त्याने काय होतं? असे उत्तर दिले. आपण मास्क वापरतच नाही, असेही ते पुढे म्हणाले.

विधानसभा अधिवेशनादरम्यान मंगळवारीदेखील मिश्रा हे मास्क न घालताच फिरत असल्याचे दिसून आले होते. ‘आपण मास्क कापरतच नाही’ या त्यांच्या वादग्रस्त कक्तक्यानंतर कोरोनाचे नियम फक्त सर्कसामान्यांसाठीच आहेत का? अशी किचारणा काँग्रेसकडून करण्यात आली. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाईची मागणी जोर धरू लागताच नरोत्तम मिश्रा यांनी ट्विट करत माफी मागत वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.

मास्क घालण्याबाबतच्या माझ्या विधानामुळे कायद्याचे उल्लंघन झाले आहे. हे माननीय पंतप्रधानांच्या भावनांशी अनुरूप नाही. मी चुकीबद्दल माफी मागतो. मी मास्क वापरणार, इतरांनीही मास्क वापरावे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करेन, असे त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या