
सामना ऑनलाईन, नागपूर
शिवसेनेचे 25 आमदार फोडण्याची वल्गना करणाऱ्या भाजपवाल्यांना आज त्यांच्याच एका आमदाराने सोडचिठ्ठी देऊन धक्का दिला. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील काटोलचे आमदार आशीष देशमुख यांनी आज भाजपला रामराम ठोकला आणि ते तडक वर्ध्याला काँग्रेसच्या व्यासपीठावर गेले.
देशमुख भाजपवर नाराजच होते. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने फक्त व्होट बँकेचे राजकारण केले, असा आरोप करीत देशमुखांनी आज आपला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा तर दिलाच, शिवाय आमदारकीचा राजीनामाही ई-मेलने विधानसभाध्यक्षांना पाठवला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे आशीष हे मोठे पुत्र. 2014च्या निवडणुकीत काटोल मतदारसंघातून भाजपतर्फे लढताना त्यांनी आपले काका राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. आशीष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या आमदारांची संख्या आता 121 झाली आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रवेशाबाबत आशीष यांनी काही जाहीर केले नसले तरी वर्ध्यामध्ये आज झालेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत ते व्यासपीठावर होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची त्यांनी भेट घेतली. आता आपली पुढची दिशा ही गांधींच्या विचारधारेनुसार आणि तत्त्वांवर असेल, असे सांगून देशमुख यांनी काँग्रेस प्रवेशाचे संकेत दिले आहेत.
पटोले, देशमुख गेले… गोटेही नाराज
भाजपच्या राजकारणाला कंटाळून यापूर्वी भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी पक्षाशी काडीमोड घेतला आणि काँग्रेसचा ‘हात’ हातात घेतला. आता देशमुखही सोडून गेले. त्यामुळे विदर्भात भाजपला जोरदार झटका बसला आहे. भाजपच्या आणखी 15 ते 16 आमदारांमध्ये पक्षनेतृत्वाबद्दल खदखद असून तेसुद्धा राजीनाम्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जळगावच्या प्रभारीपदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केल्याने धुळय़ाचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे गोटे आता काय निर्णय घेतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.






























































