भाजप आमदार संजय सावकारेंची चौकशी होणार

1486

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी भाजपचे आमदार संजय सावकारे यांची चौकशी होणार आहे. ज्या दिवशी अश्विनी यांची बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने हत्या केली, त्याच दिवशी सावकारे हे आपल्या एका व्यापारी मित्रासह या हत्याकांडातील आरोपी राजेश पाटील याच्याबरोबर अंधेरी येथील जिप्सी बारमध्ये बसले होते, अशी माहिती आता पुढे आली आहे. त्यामुळे लवकरच सावकारे यांना साक्ष देण्यासाठी पनवेल सत्र न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

अभय कुरुंदकर याने मीरा रोड येथील आपल्या राहत्या घरी 11 एप्रिल 2016 रोजी रात्री अश्विनी बिद्रे यांची डोक्यात बॅटचा फटका मारून हत्या केली. त्यानंतर त्याने अश्विनी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी भाजप नेते एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याला फोन केला. त्यावेळी पाटील हा अंधेरीतील जिप्सी बारमध्ये भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि कपडय़ाचे व्यापारी किरण महाजन यांच्याबरोबर बसला होता. राजकीय दबावामुळे या प्रकरणात सावकारे यांचे नाव पुढे आले नाही. मात्र आता खटल्याची सुनावणी पनवेल सत्र न्यायालयात सुरू झाली आहे. त्यामुळे सावकारे यांची चौकशी करण्यासाठी तपास यंत्रणेने जोरदार फिल्डिंग लावली आहे. या प्रकरणात 139 साक्षीदारांचा समावेश आहे. त्यामध्ये आता या आमदारांचीही भर पडणार आहे.

राजेश पाटील याने आपल्या जबाबामध्ये मी, सावकारे आणि महाजन 11 एप्रिल 2016 च्या रात्री जिप्सी बारमध्ये बसलो होतो, असे सांगितले आहे. मात्र सावकारे आणि महाजन यांच्या जबाबामध्ये राजेश पाटील मीरा रोडला गेल्यानंतर सावकारे तिथे आले असे नमूद केले आहे. त्यामुळे त्या दिवशी नेमके काय घडले हे उघड होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी व्यक्त केली आहे.

कुरुंदकरच्या डोक्यावर परिणाम झाला काय?
अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी न्यायालयात काल आरोपींची ओळखपरेड झाली. त्यावेळी कुरुंदकरचे वर्तन थोडेसे विचित्र होते. न्यायालयात जाण्यासाठी त्याने लाइटच्या पाइपवरून उडी मारली. पोलीस कोठडीत असतानाही कुरुंदकर ‘शोले’ चित्रपटातील गब्बरसिंगप्रमाणे हसला होतो. त्याचीच पुनरावृत्ती काल न्यायालयात घडली. त्यामुळे न्यायालयात उपस्थित असलेले वकील आणि तपास पथकातील अधिकारी चक्रावून गेले. त्याच्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही ना, असा प्रश्न त्यांच्या मनात आला.

आपली प्रतिक्रिया द्या