भाजप आमदारांचे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मौन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केलेले भाकित आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांची खदखद एकीकडे जाहीररित्या व्यक्त होत आहे. मात्र भाजपचे आमदार मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मौनच धारण करून आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराचे सोडून दुसऱया विषयावर बोला असे आता उघडपणे बोलू लागले आहेत. त्यामुळे मिंधे गटाची अस्वस्थता वाढली आहे.

मंत्रिमंडळाचा दुसऱया टप्प्यातील विस्तार होत नसल्याने शिंदे गटातील इच्छुक आमदारांकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्याही नवनवीन तारखा  जाहीर केल्या जात आहेत. मंत्रीपदासाठी बाशिंग बांधून असलेले आमदार संजय शिरसाट यांनी 20 ते 22 जानेवारीला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी तारीख जाहीर केली. मंत्रिमंडळ विस्तारात काही तांत्रिक अडचणी आहेत त्या 15 जानेवारीपर्यंत संपतील असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले होते.

तर दुसरीकडे मंत्रीपद मिळत नसल्याने बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. दिव्यांग मंत्रालयाचे मंत्रीपद तुमच्याकडे कधी येणार, असा प्रश्न पत्रकारांनी  बच्चू कडू यांना विचारला असता त्यांनी हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विचारा, असे उत्तर दिले. आम्ही सर्व आमदार एकत्र बसतो तेव्हा मी त्यांना सांगतो की, 2024 नंतरच विस्तार होईल. एवढय़ात विस्तार झाला तर तुम्हाला पेढे भरवू. पण आम्ही आमदारांनी आमची मानसिकता बनवली आहे, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी खदखद व्यक्त केली.

 भाजपचे आमदार मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सोयीस्कररित्या मौन बाळगून आहेत. भाजपच्या एका माजी मंत्र्याने मंत्रालयात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मंत्रिमंडळ विस्तारावर काही विचारू नका असे सांगितले. तो विषय सोडून दुसऱया विषयावर बोला, अशा शब्दात मनातील खदखद व्यक्त करीत हसण्यावर वेळ मारून नेली. आमचे व्यवस्थित चालले आहे. 2024 अखेरपर्यंत ते व्यवस्थित चालेल असे सांगत इतक्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही असे संकेत दिले.