संविधानाचे पालन करा किंवा फाडून फेकून द्या! भाजप आमदाराचे विधान

955

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) देशातील अनेक भागांमध्ये आंदोलन सुरू आहे. अनेक राज्यांनी याला तीव्र विरोध केला असून हा कायदा मागे घेण्याचीही मागणी केली आहे. आता थेट भारतीय जनता पक्षाच्या आमदारानेच या कायद्याविरोधात मोर्चा खोलला आहे. मध्य प्रदेशमधील मेहेर या मतदारसंघातील भाजप आमदार नारायण त्रिपाठी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला असून देशात संघर्षाची स्थिती असल्याचे म्हटले आहे.

लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या सीएए कायद्याला अनेक ठिकाणी विरोध होत असताना गृहमंत्री अमित शहांनी हा कायदा मागे घेणार नाही अशी गर्जना केली होती. भाजपचे इतर नेतेही शहांची री ओढत होते. परंतु मध्य प्रदेशमधील एका आमदाराने पक्षविरोधी भूमिका घेत या कायद्याला विरोध केला असून यामुळे देशात संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले. तसेच मुसलमान लोक आता आमचे (भाजप नेत्यांचे) तोंडही पाहणे पसंद करत नाहीत, असेही ते म्हणाले.

शाहीन बागवाले तुमच्या मुली, बहिणींवर बलात्कार करतील, भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

आमदार नारायण त्रिपाठी सीएएला विरोध करताना म्हणाले की, एक तर आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाचे पालन करायला हवे किंवा त्याला फाडून फेकून द्यायला हवे. देशाचे संविधान सांगते की आपल्या देशात धर्माच्या आधारे विभागणी केली जावू शकत नाही, परंतु सध्या देशाच्या धार्मिक विभाजनाची स्थिती निर्माण झाली आहे. देशात संघर्षाची स्थिती आहे. लोकांनी एकमेकांकडे पाहणेही बंद केले आहे. आमच्या गावात मुसलमानही राहतात. आधी ते आम्हाला मान सन्मान द्यायचे मात्र आता ते आम्हाचे तोंडही पाहू इच्छित नाही.

ते पुढे म्हणाले, ज्या घरात, गावात आणि देशात संघर्षाची स्थिती असेत तिथे शांतता राखली जावू शकत नाही. आम्ही एकता आणि अखंडतेच्या बाता मारतो, मात्र धर्माच्या आधारे देशात विभाजन होत असेल तर अशा स्थितीत देश पुढे जावू शकत नाही. तसेच सीएए मतांच्या राजकारणासाठी योग्य असले तरी देशासाठी योग्य नसल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या