भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा मस्तवालपणा; हिंमत असेल तर अटक करून दाखवा!

866

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मस्तवालपणाची आणखी एक घटना समोर आली आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, पण अटक झाली नाही. हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा, असे आव्हानच नरेंद्र मेहता यांनी पोलिसांना दिले आहे. माझा भाऊ आणि वहिनी महापौर डिंपल मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचीच बदली झाली आहे, अशी धमकीच त्यांनी दिल्याने ठाणे ग्रामीण पोलीस मेहतांच्या दबावाखाली काम करतात काय, असा सवाल विचारला जात आहे.

कांदळवनाची बेछूट कत्तल करून त्यावर पंचतारांकित क्लब उभारणारे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बडगा उगारताच मीरा रोड पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. परंतु त्यानंतरही त्यांना अटक करण्यास टाळाटाळ केली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा रोड येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मेहता यांनी आपल्या बेटकुळय़ा फुगवल्या. ते म्हणाले, गेल्या 12 वर्षांत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत आणि आजही होत आहेत. त्याने मला फरक पडत नाही. पोलिसांनी मला अटक करून दाखवावीच.. ज्याने माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावला त्याला मी सोडणार नाही, अशी धमकीच त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते धीरज परब यांना दिली.

मेहतांचा खोटारडेपणा उघड

आमदार मेहता यांनी आपल्या खोटारडेपणाचा नमुनाच यावेळी सादर केला. काही दिवसांपूर्वी विधिमंडळात बोलताना मेहता यांनी माझ्यावर एकही गुन्हा दाखल असल्यास राजकारणातून संन्यास घेईन, अशा वल्गना  केल्या होत्या. त्याच मेहता यांनी पक्षाच्या मेळाव्यात 12 वर्षांत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, असे छाती ठोकून सांगितले.

मेहतांचा क्राइम रिपोर्ट

  • भाईंदरचा ठेकेदार हनुमंत ठेकेदार यांच्याकडून 20 हजार रुपयांची लाच घेताना नरेंद्र मेहता यांना 27 डिसेंबर 2002 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
  • मीरा रोड येथील बिल्डर त्रिवेदी यांच्याकडे बांधकाम करण्यासाठी मेहतांवर खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
  • भाजपच्या माजी महिला नगरसेविका सीमा जैन आणि सामाजिक कार्यकर्ते वसंत माने यांच्या घरात जबरदस्तीने घुसून तोडफोड करण्याचा गुन्हा मेहतांवर दाखल झाला आहे.
  • कांदळवनाची कत्तल करून स्वतःच्या आलिशान क्लबसह अन्य इमारती बांधण्याचे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या