लय झालं… अजित पवारांना आवरा; भाजप आमदारांचे अमित शहांकडे रडगाणे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱयात भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटामधील बेबनाव चव्हाटय़ावर आला आहे. भाजप आमदारांनी अमित शहांकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. लय झालं… आता अजित पवारांना आवरा, असे रडगाणेच भाजप आमदारांनी शहांकडे मांडल्याची माहिती समोर आली आहे.

अमित शहा या दौऱयात विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई अशा तीन विभागांना भेटी देऊन, तेथील पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱयांशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करत असल्याचे सांगितले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मित्रपक्षांमध्ये भाजप मित्रपक्षांमध्येही नंबर वन कसा राहील, याची काळजी घेण्याचे निर्देशदेखील शहा यांनी दिल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे जे उमेदवार पराभूत झाले त्यांना ताकद देऊन भाजपला शह देण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून होत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजप पदाधिकाऱयांची बरीच ओढाताण होत आहे. काहीही करा पण अजित पवार यांना आवरा, अशी कळकळ भाजप आमदारांनी शहा यांच्याकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समजते. दरम्यान, आज शहा यांच्या नियोजित दौऱयामध्ये अचानक बदल झाल्याने ते दिल्लीला रवाना झाले.

n नांदेडच्या शंखनाद मेळाव्यानंतर भाजप आमदारांनी शहा यांची भेट घेतली. अजित पवार यांच्याकडून भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या कामात जाणीवपूर्वक अडथळा आणला जात असून भाजप आमदार आणि पदाधिकाऱयांच्या विरोधकांना ताकद देण्याचे काम करत आहेत, अशी तक्रार भाजप आमदारांनी शहा यांच्याकडे केल्याचे समजते.

दादा, जरा सब्र से काम लिजिये!

सोमवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर शहा आणि अजित पवार यांची भेट झाली. सुमारे वीस मिनिटे ही भेट चालली. चर्चेचा तपशील समोर आलेला नाही. पण शहा यांनी दादा, जरा सब्र से काम लिजिये, असे आवाहन अजित पवार यांना केल्याचे सांगितले जाते.