
आम आदमी पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणारे खासदार संदीप पाठक यांच्यावर आज मागच्या दाराने पळून जाण्याची वेळ आली. पाठक यांच्यावर पंजाब पोलिसांनी महिला अत्याचार आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. हे कळताच अटकेच्या भीतीने पाठक घर सोडून फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
‘आप’ने विचारधारा आणि नैतिकतेपासून फारकत घेतल्याचा आरोप करत पाठक यांनी मागील आठवडय़ात भाजपला जवळ केले होते. त्याच पाठक यांच्या विरोधात महिलेचे लैंगिक शोषण आणि भ्रष्टाचार प्रकरणात पंजाबमध्ये अजामीनपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात कारवाईसाठी पंजाब पोलीस आज पाठक यांच्या दिल्ली येथील सरकारी निवासस्थानी पोहोचले. हे कळताच पाठक यांनी मागच्या दाराने बाहेर पडून कारमधून पोबारा केला.
आरोपीच्या बचावासाठी भाजपची धडपड
संदीप पाठक अडचणीत आल्याने आता भाजपने त्यांच्या बचावासाठी धावपळ सुरू केली आहे. पाठक यांना कायद्याच्या कचाटय़ातून सोडवण्यासाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे. भाजपने ‘आप’वर सुडाच्या राजकारणाचा आरोप केला आहे.




























































