उद्योग कठीण काळातून जात आहेत, मंदीमुळे विकास दरात वाढ नाही – गडकरी 

2255

जागतिक मंदीच्या काळात अनेक उद्योग कठीण काळातून जात आहेत. मात्र, उद्योजकांनी निराश होण्याची गरज नाही. ही कठीण वेळ निघून जाईल, असे हिंदुस्थानच्या अर्थव्यस्थेत आलेल्या सुस्तीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. विदर्भ उद्योग संघाच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ‘मला माहित आहे की उद्योग एक अतिशय बिकट परिस्थितून जात आहेत. आम्हाला विकास दर वाढवायचा आहे. पण मंदीमुळे ते शक्य होत नाही.’ ते म्हणाले, अलीकडेच त्यांनी ऑटोमोबाईल उत्पादकांची भेट घेतली. त्यावेळी वेळी हज उद्योग संकटात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी ते म्हणाले, उद्योगात कधी तेजी असते, तर कधी मंदी असते. कधी तुम्ही यशस्वी होता, तर कधी अपयश पदरी पडते. हेच जीवनचक्र आहे, त्यामुळे निराश न होता या परिस्थितीशी मुकाबला करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.

गडकरी यांच्या वक्तव्याच्या एक दिवस आधीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबत वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, ‘अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता आता मध्यम उत्पन्न असलेल्या लोकांना आणि स्वस्त घरांसाठी सरकार 10000 कोटी रुपयांचा निधी देणार आहे. ही मदत बांधकाम सुरु असलेल्या घरांसाठी असेल. उर्वरित 10,000 कोटी रुपये अन्य गुंतवणूकदारांकडून येतील. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी वितरित केला जाईल. हा निधी फक्त अशा गृहनिर्माण प्रकल्पांना उपलब्ध असेल जे एनपीए नाहीत किंवा एनसीएलटीमध्ये नाहीत. या घोषणेमुळे सुमारे साडेतीन लाख घर खरेदीदारांना फायदा होणार आहे.

दरम्यान हिंदुस्थानच्या मरगळलेल्या अर्थव्यवस्थेवरून विरोधी पक्ष सरकारविरोधात हल्लाबोल करत आहेत. सरकार देशाची अर्थव्यवस्था संपवत आहे, असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत. ‘आधी सरकार म्हणाले होती की, उबर मुळे नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे आणि आता सरकार असं म्हणत आहे की यामुळे देशात मंदी आली आहे, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या