
भाजपच्या कार्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमादरम्यान अचानक गोंधळ उडाल्याची घटना बुधवारी घडली. एका महिलेने कार्यक्रमस्थळी घुसून पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यावर लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप करत त्याच्यावर हल्ला केला.
ही घटना महाराजगंज जिल्ह्यातील भाजप कार्यालयात घडली. नामनिर्देशित नगरसेवक आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या सत्कारासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरू होताच संबंधित महिला तेथे पोहोचली आणि तिने थेट एका पदाधिकाऱ्याला जाब विचारण्यास सुरुवात केली.
प्रत्यक्षदर्शींनुसार, महिलेने त्या नेत्याच्या कानशिलात लगावली आणि त्याला कॉलर पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वाद अधिकच चिघळला.
महिलेचा आरोप आहे की तिने एलआयसीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली संबंधित पदाधिकाऱ्याला सुमारे 4.5 लाख रुपये दिले होते. मात्र, ते पैसे जमा न करता त्याने अपहार केल्याचा आरोप तिने केला. बराच काळ पैसे परत देण्याची मागणी करूनही प्रतिसाद न मिळाल्याने ती आपल्या मुलासह थेट कार्यक्रमस्थळी पोहोचल्याचे समजते. दोघांनीही तात्काळ पैसे परत करण्याची मागणी केली. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण महिला ऐकण्याच्या मनःस्थितीच नव्हती. यामध्ये ढकलाढकली, शाब्दिक वाद आणि चप्पल फेकण्याच्या घटनाही घडल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित महिला आणि वादातील इतरांना कार्यालयाबाहेर नेण्यात आले. सुमारे एक तास गोंधळ सुरू राहिल्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला.
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी उमेदवार समीर त्रिपाठी यांनी सांगितले की, पैशांच्या व्यवहारावरून हा वाद अचानक उफाळून आला. याची पूर्वकल्पना असती, तर परिस्थिती टाळता आली असती. दोघेही भाजपचेच सदस्य असून हा वाद लवकरच मिटवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात महिला संबंधित पदाधिकाऱ्यावर हल्ला करताना आणि उपस्थित लोक परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

























































