दोघांत तिसरा कोण… भाजपकडून राज्यसभेसाठी चाचपणी सुरू

1579
udayanraje-bhosale

राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या कोटय़ाच्या सात जागा रिक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या जागी नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही राज्यसभेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. शुक्रवारी दिल्लीत झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत दोन उमेदवारांच्या नावांवर जवळपास एकमत झाले. दोघांत तिसरा कोण याबाबत खल सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी दिल्लीत बैठक झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार व धनंजय महाडिक, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले उदयनराजे भोसलेही या बैठकीला उपस्थित होते.

भाजपने राष्ट्रपतींच्या कोटय़ातून छत्रपती संभाजीराजेंना यापूर्वीच राज्यसभेत संधी दिली आहे. मात्र संभाजीराजेंनी भाजपपासून सुरुवातीपासूनच सुरक्षित अंतर राखले असून पक्ष अडचणीत असतानाही संभाजीराजेंनी कधी भाजपचे समर्थन करणारी भूमिका घेतली नसल्यामुळे भाजप नेतृत्व संभाजीराजेंवर नाखूश असल्याची चर्चा पक्षांतर्गत वर्तुळात आहे. त्यामुळे संभाजीराजेंना सक्षम पर्याय म्हणूनही साताऱयाचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची संधी दिली जाण्याची शक्यता असून त्यांची उमेदवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत पक्की झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

साबळेंचा पत्ता कट?
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा तसा भाजपला दलित मतांची बेगमी करण्यासाठी काहीही राजकीय फायदा झालेला नसला तरी आठवलेंची उमेदवारी कापल्यास त्याचा विपरीत संदेश जाण्याची भीती भाजप नेतृत्वाला वाटत आहे. त्यामुळे राज्यात कोणतीही राजकीय ताकद नसताना आठवलेंना पुन्हा राज्यसभेची लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी भाजपचे केडरबेस कार्यकर्ते असलेल्या खासदार अमर साबळे यांचा पत्ता कट करण्यात येणार आहे.

तिसऱया जागेसाठी शायना एन. सी., हंसराज अहिर यांची नावे चर्चेत
राज्यसभेच्या तिसऱया जागेसाठी भाजपमध्ये मोठी रस्सीखेच असली तरी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे नाव आघाडीवर आहे. अंतर्गत वादातून मुनगंटीवारांनीच अहिरांचा पराभव घडवून आणल्याची भाजप वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे ओबीसी आणि विदर्भातील चेहरा म्हणून अहिरांच्या नावाची चर्चा आहे. अहिर यांच्याशिवाय बँकिंग क्षेत्रातील एका व्यक्तीसोबतच शायना एन. सी. यांचेही नाव चर्चेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या