Lok sabha 2019 शहांच्या उपस्थितीत भाजपचा ‘नऊ सूत्री’ जाहीरनामा प्रसिद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर

लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्किम आणि अरुणाचलप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ओडिशा राज्याच्या विकासासाठी नऊसूत्री जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भुवनेश्वरमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक बडे नेते यावेळी उपस्थित होते.

भाजपने ओडिशा राज्यासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातून जीवनाश्यक सुविधांसह महिलांची सुरक्षा, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांवर लक्ष्य वेधले आहे. साधनसंपत्तीने समृद्ध असणाऱ्या ओडिशा राज्यातील लोक आजही गरीब का आहेत? असा सवाल यावेळी अमित शहा यांनी उपस्थित केला. तसेच समृद्ध ओडिशासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

देश आणि राज्यांना भ्रष्टाचार मुक्त करणाऱ्या सरकारला ओडिशातील नागरिकांनी निवडून द्यावे. विकास आणि गरिबीमुक्तीसाठी लढणाऱ्या सरकार निवडून देणे आपले आद्य कर्तव्य असल्याचे अमित शहा म्हणाले. यावेळी शहा यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन देत सावकारांना हद्दपार करण्यात येईल, तसेच शून्य टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येईल असे ते म्हणाले. तसेच शेतीसाठी पाणीयोजनांसाठी भाजप 1 लाख कोटींची गुंतवणूक करेल, तसेच लघू उद्योगांना उभारी देण्याची आमची प्राथमिकता असेल असेही शहा म्हणाले.

लहान आणि मध्यम भूधारक शेतकऱ्यांना, शेतीतील मजुरांना 60 वर्षानंतर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच सत्ता आत्यानंतर दोन वर्षांच्या आत सर्व रिक्त जागा भरल्या जातील, केजी पासून पीजीपर्यंत गरिबांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था केली जाईल, असेही आश्वासन शहा यांनी दिले. कुपोषणमुक्तीसाठी कार्य करण्यात येईल व आयुष्मान भारत योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देऊ, असेही शहा यावेळी म्हणाले. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज उभारण्यात येईल असेही ते म्हणाले. ओडिशामध्ये सुभाष चंद्र बोस यांच्या नावाने 3500 कोटींच्या अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करून नवीन योजना सुरू केल्या जातील, 1500 कोटींचा वापर करून 15 स्मार्ट सिटींचे निर्माण करण्याय येईल असेही ते म्हणाले.