
सीएएवर ठाम राहिलेल्या मोदी सरकारला परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपरिषदेने मोठा झटका दिला. भाजपचीच सत्ता असलेल्या या नगरपरिषदेने आपल्या कार्यक्षेत्रात सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा ठराव सर्वानुमते मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सोमवारी दिली.
नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा 28 फेब्रुवारीला पार पडली. या सभेत भाजपचे नगराध्यक्ष असलेल्या विनोद बोराडे यांनी सीएए आणि एनआरसी लागू न करण्याबाबतचा विषय मांडला. त्यावर सर्व सदस्यांनी चर्चा केली. त्यांच्या या प्रस्तावावर नगरसेवक अब्दुल वहिद हमीद यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्वानुमते सीएए आणि एनआरसीविरोधी ठराव मंजूर करण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि 7 मुस्लिम नगरसेवकांच्या सांगण्यावरून ठराव मंजूर करण्याच्या दोन दिवस आधी एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सीएए आणि एनआरसीची अंमलबजावणी न करण्याचे ठरवले होते, असे बोराडे यांनी सांगितले.
आमदार मेघना बोर्डीकर अडचणीत
नगराध्यक्ष विनोद बोराडे हे भाजप आमदार मेघना बोर्डीकर व त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. बोर्डीकर यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधामुळेच बोराडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी महाजनादेश यात्रेत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अठरा नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता सीएए-एनआरसीविरोधी ठराव करून बोराडे यांनी केंद्रातील भाजप सरकारलाच मोठा झटका दिला आहे. त्यामुळे आमदार मेघना बोर्डीकर अडचणीत सापडल्या आहेत.


























































