
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावरून भाजप नेत्यांनी आज गुरुवारी काँग्रेसला चांगलेच घेरले. राहुल गेल्या पाच वर्षांत तब्बल 16 वेळा परदेश दौऱ्यावर गेले. इतक्या वेळा ते त्यांच्या अमेठी मतदारसंघातही गेले नाहीत. त्यामुळेच तेथील जनतेने त्यांना स्वीकारले नाही. राहुल इतक्या वेळा परदेश दौऱयावर जातात म्हणजे ते एखाद्या गुप्त मोहिमेवर आहेत काय, असा खोचक सवाल भाजप प्रवक्ते जीवीएल नरसिंह राव यांनी काँग्रेसला केला आहे.
नवी दिल्लीतील पक्षकार्यालयात राव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. राहुल गांधी 16 वेळा परदेश दौऱ्यावर गेले, परंतु त्यातील नऊ वेळा ते कुठे गेले होते याचा खुलासा त्यांनी कधीच केला नाही. याबाबत त्यांनी कधी काहीच का सांगितले नाही? ते एखाद्या गुप्त मोहिमेवर आहेत काय,
राहुल यांचा दौरा ध्यानधारणेसाठी – काँग्रेस
राहुल गांधी ऑक्टोबर महिन्यात दुसऱयांदा परदेश दौऱयावर गेले आहेत. 28 ऑक्टोबर रोजी ते या दौऱयासाठी रवाना झाले. आठवडाभर ते परदेशात राहणार आहेत. राहुल मनःशांती किंवा ध्यानधारणेसाठी वेळोवेळी परदेश दौऱयावर जातात असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी दिले आहे. आर्थिक मंदी आणि ढासळत चाललेली अर्थव्यवस्था या मुद्दय़ांवर काँग्रेस 1 ते 8 नोव्हेंबरदरम्यान 35 पत्रकार परिषदा घेऊन सरकारचा निषेध करणार आहे. तसेच 5 ते 15 नोव्हेंबरदरम्यान देशव्यापी आंदोलनही करणार असल्याचे सुरजेवाला म्हणाले. या सर्व कार्यक्रमाची आखणी राहुल गांधी यांच्याच मार्गदर्शनाखाली झाल्याचेही ते म्हणाले.
नेहरू-गांधी कुटुंबीयांनी अनेक महान नेत्यांचा तिरस्कार केला
राहुल गांधी यांच्याकडे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहण्यासाठीही वेळ नाही ही अत्यंत शरमेची बाब आहे, अशी टीका भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. ही आश्चर्याची गोष्ट नाही. कारण यापूर्वी नेहरू आणि गांधी कुटुंबीयांनी अनेक महान नेत्यांचा अनेकदा तिरस्कार केल्याचेही मालवीय यांनी म्हटले आहे.



























































