पालिकेच्या कारभारात ढवळाढवळ करण्याचा भाजपचा डाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, निवडणुका होईपर्यंत महापालिकेत पालकमंत्र्यांचे कार्यालय राहणार

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊन नगरसेवक निवडून येईपर्यंत महापालिका मुख्यालयात सुरू केलेले पालकमंत्र्यांचे कार्यालय सुरूच राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले. यामुळे पालिकेच्या कामावर ‘भाजपची नजर’ राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून पालिकेच्या कारभारात ढवळाढवळ करण्यासाठीचा हा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेत सध्या निवडून आलेले नगरसेवक नसल्याने या ठिकाणी तक्रारी घेऊन येणाऱया नागरिकांच्या सोयीसाठी पालकमंत्र्यांचे हे कार्यालय सुरू केले असल्याचे फडणवीस म्हणाले. दरम्यान, मुंबई महानगरपालिका स्वायत्त संस्था असून महापालिका कायदा-1888 नुसार चालत असताना पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कारभारात सरकारकडून ढवळाढवळ करण्यासाठीच पालकमंत्र्यांचे कार्यालय सुरू करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करण्यात आला होता. याबाबत आमदार सुनील शिंदे यांनी याबाबत 289नुसार सूचना मांडता हा प्रकार सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला होता. या वेळी आमदार अॅड. अनिल परब यांनीदेखील राज्य सरकारने पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी पालकमंत्र्यांचे कार्यालय सुरू केल्याचे म्हटले होते.

सर्वच पक्ष कार्यालये सुरू करा
पालिकेत येणाऱया नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी हे कार्यालय सुरू केल्याचे या वेळी फडणवीस म्हणाले. मग इतर पक्षांची कार्यालये का सुरू केली नाही, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेसह इतर पक्षांनी पक्ष कार्यालये सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र पालिका प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय अद्याप दिलेला नाही.