निकालाआधीच विजयी जल्लोषासाठी भाजपची तयारी

991
फोटो प्रातिनिधीक

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महायुतीला मतदारांचा कौल मिळणार हे एक्झिट पोलमुळे स्पष्ट झाल्यानंतर प्रत्यक्ष निकालाआधीच भाजपच्या कार्यालयात जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडून यासाठी महापालिकेला पत्र पाठविण्यात आले असून मंडप आणि व्यासपीठ उभारण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला 240 पर्यंत जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला. भाजप-शिवसेना शंभरी पार जागा मिळतील असेही अंदाज वर्तविण्यात आले. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. याचाच आधार घेत भाजपाने मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी राज्यभरात जल्लोष करण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर विजयी जल्लोषासाठी  मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे एका पत्राद्वारे परवानगी मागण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरीमन पॉंईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेरील फुटपाथ व त्या परिसरात  मंडप व व्यासपीठ उभारण्यात अनुमती द्यावी, अशी या पत्रात मागणी करण्यात आली आहे. प्रदेश कार्यालयाच्या बाहेर व्यासपीठ उभारून सजावट करण्याचा पक्षाचा मनोदय असून त्या ठिकाणी विजयी उमेदवारांचे स्वागत व अभिनंदन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचे भाजपाच्या पत्रात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या