महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न, संजय राऊत यांचा घणाघात

मतदारयादीत गडबड करून मूळ मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याच प्रयत्न करत आहेत असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच भाजपचा महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न आहे असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, निवडणूक मतदार यादीविरोधात राहुल गांधी सतत आवाज उठवत आहेत. निवडणूक आयोगाने बिहारमध्ये मतदारयादीत नाव टाकण्यासाठी जे भयंकर नियम आणले आहेत, त्याचा अर्थ काय आहे. संघाचे एक लाख स्वयंसेवक बिहारमध्ये जाऊन मतदारयादीत नाव वाढवण्यासाठी काम करणार आहेत. त्याचा अर्थ काय आहे?

तसेच महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही निवडणूक हायजॅक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मतदारयादीत गडबड करून मूळ मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याच प्रयत्न करत आहेत. मतदार यादीत बाहेरच्या राज्यांच्या लोकांची नावं टाकून त्यांना ही निवडणूक लढवायची आहे. महाराष्ट्रात 60 लाखांपेक्षा जास्त मतदार संध्याकाळी कुठून आले? त्याचे उत्तर निवडणूक आयोगाने अद्याप दिलेले नाही. राहुल गांधी आम्ही हे प्रश्न उपस्थित केले होते. पण निवडणूक आयोग असो किंवा सर्वोच्च न्यायालय यावर सुनावणी करायला तयार नाही असेही संजय राऊत म्हणाले.