
सामना प्रतिनिधी । लातूर
लोकसभा निवडणुकीत 300 ते 325 जागा एनडीएला मिळतील. भाजपाला 260 ते 270 जागा मिळतील आणि देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार स्थापण होईल, असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पुन्हा एकदा देशात एनडीएचे सरकार स्थापन होईल. एनडीएला देशात 300 ते 325 जागा मिळतील. भाजपाला 260 ते 270 जागा मिळतील. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेसलाच बसणार असेही त्यांनी सांगितले. या पूर्वीच्या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची हवा होती आता त्यांच्या कामाची हवा आहे. काही ठिकाणी मताधिक्य कमी होतील, तर काही ठिकाणी जागा वाढतीलही. परंतू पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन होईल असेही त्यांनी सांगितले.
तसेच आपणास पुन्हा राज्यसभेवर घेण्याचे आणि मंत्रीपद देण्याचे अश्वासन दिलेले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सत्तेतही योग्य तो वाटा देण्याचे अश्वासन दिलेले आहे. महात्मा फुले आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आलेले आहे. महिला आयोगाचे सदस्यपदही रिपाईला दिलेले आहे असेही रामदास आठवले यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सध्यातरी वेगळा कोणताही विचार नाही एनडीए सोबतच राहणार असेही त्यांनी म्हटले आहे.


























































