
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार तर कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेस समविचारी पक्षांच्या सत्ता होत्या. मात्र, भाजपने कपट कारस्थाने व प्रशासकीय यंत्रणेमार्फत दबावतंत्राचा वापर करून त्या राज्यांमध्ये सत्तेत येण्याचे स्वप्न साकार केले. खोके आणि निष्ठsचा महाराष्ट्रात सुतराम संबंध नाही. सातारा जिह्यात आमची ताकद मजबूत असल्याने आगामी काळात कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची घोडदौड राहील, असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
खटाव तालुक्यातील राजापूर येथे विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सारंग पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सातारा जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, मानाजी घाडगे, महेश नलवडे, पोपटराव बिटले, राजेंद्र घाटगे उपस्थित होते.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, भाजपच्या ‘अच्छे दिन’ला देशातील जनता कंटाळली आहे. महागाईने अक्षरशः कळस गाठला आहे. तर, बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. देशातील राजकीय चित्र आता बदलू लागले आहे. नुकत्याच झालेल्या पाच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुशिक्षित मतदारांनी शिंदे फडणवीस सरकारला नाकारून महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे.
डॉ. सुरेश जाधव म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कालावधी संपून अकरा महिने लोटले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीच बाजी मारण्याची शक्यता आहे. म्हणून शिंदे-फडणवीस सरकार या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करीत नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटाला आम्ही हद्दपार करू.
प्रदीप विधाते म्हणाले, खटाव तालुक्याला विकासात्मक, सकारात्मक व सुसंस्कृत राजकारण करण्याचा वारसा आहे. समाज घडवण्यासाठी राजकारण केले जाते. ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका पिढय़ान्पिढय़ा बिनविरोध करण्याची प्रथा आहे. अशा गावांमध्ये कोरेगाव विधानसभा मतदासंघाचे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक निवडणुका लादून चुकीचा पायंडा पाडत आहेत.
































































