
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीत फक्त सतरंज्याच उचलायच्या का? असे का, बोलले जात आहे याचा प्रत्यय अमरावतीमध्ये आला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका उमेदवाराचा भाजप कार्यकर्त्याला प्रचार करावा लागतोय. यात खरी मेख म्हणजे आधीच्या निवडणुकीत ज्या भाजपच्या उमेदवाराने काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता, आता त्याच काँग्रेसच्या उमेदवाराचा भाजपच्या माजी नगरसेवकाला प्रचार करण्याची वेळ आली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे या माजी नगरसेवकाची चांगलीच गोची झाली आहे.
अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांची निवड करताना वरिष्ठांकडून अनेक निष्ठावंतांना डावलून आयारामांना भाजपचे तिकीट देण्यात आले आहे. यामुळे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. शहरातील आंबापेठ प्रभागात 2017 च्या निवडणुकीत जवळपास 3 हजार मतांच्या फरकाने विजयी झालेले भाजपचे माजी नगरसेवक अजय सरसकर यांना या वेळी पक्षाने उमेदवारी नाकारली. विशेष म्हणजे, ज्या काँग्रेस उमेदवाराचा त्यांनी मागील निवडणुकीत पराभव केला होता, त्याच उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिली आहे. आता आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करा, असे आदेश देऊन भाजपने अजय सरसकर यांची चांगलीच गोची केली आहे. अजय सरकसर यांच्यावर पक्षाने ही वेळ आणल्याने याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
कोणत्या तोंडाने मते मागू
मी युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना प्रामाणिक काम केलेय. मात्र त्या उमेदवाराला मी मागील निवडणुकीत पराभूत केले होते. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा टीका केली. त्याच उमेदवारासाठी मला काम करावे लागतेय, असा संताप अजय सरसकर यांनी व्यक्त केलाय.


























































