भाईंदरमध्ये शिवसेनेच्या विकास निधीवर भाजपच्या लोकप्रतिनिधींचा डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp-shivsena

सामना प्रतिनिधी । भाईंदर

भाईंदर मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून शिवसेनेने आणलेला पाच कोटींच्या निधीवर डल्ला मारण्याचा भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा डाव सरकारनेच हाणून पाडला आहे. महापौर डिंपल मेहता यांना हाताशी धरून महासभेच्या माध्यमातून शिवसेना आमदारांचा विकास निधी नरेंद्र मेहता यांनी आपल्या मतदारसंघात पळवला. मात्र त्यांची ही पळवापळवी थेट मुख्यमंत्र्यांसमोर उघड झाल्याने नगरविकास खात्याने पालिकेचे ठराव रद्द करून या शासकीय निधीतून शिवसेनेने सुचवलेली विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आमदार नरेंद्र मेहता व महापौर डिंपल मेहता यांना जबरदस्त चपराक बसली असून दोघेही तोंडघशी पडले आहेत.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या ओवळा-माजीवडा मतदारसंघात येणाऱ्या मीरा-भाईंदर पालिका हद्दीतील चेना गावाकडे जाणारा रस्ता आणि चेना नदीवरील पूल यासाठी 4 कोटी रुपये, माशाचा पाडा- दाचपुळ पाडा आणि वर्सोवा येथील स्मशानभूमी यासाठी प्रत्येकी 20 लाख रुपये, तसेच घोडबंदर गावातील आणि गावाबाहेरील नूतनीकरणासाठी प्रत्येकी 20 लाख रुपये यानुसार एपूण 5 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करून आणला होता. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना याची माहिती मिळताच महापौर डिंपल मेहता यांच्याशी संगनमत करून 19 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या महासभेत याच निधीच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील विकासकामे बहुमताने मंजूर करून घेतली. आमदार सरनाईक यांना या हेराफेरीची माहिती मिळताच त्यांनी याबाबत आमदार सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तातडीने कार्यवाही केली.

सत्तेचा दुरुपयोग
राजकारणात काही संकेत पाळले पाहिजेत. सत्तेचा असा दुरुपयोग योग्य नाही, हेच यांना कळत नाही.
– प्रताप सरनाईक, आमदार.