महाराष्ट्रविरुद्ध भाजपचे विशेष सूडचक्र! उद्योग पळवले, गुंतवणूक वळवली; काँग्रेसने केला आरोप

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्राविरुद्ध भाजपचे ‘विशेष सूडचक्र’ सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला. महायुतीतील कोणीही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसला तरी, त्याच्या नाडय़ा गुजरात आणि दिल्लीच्याच हातात असतात, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर केला.

काँग्रेसचा मात्र संपूर्ण देशाच्या समान विकासावर विश्वास आहे, आमचे कुठलेही एखादेच आवडते असे खेळणे नाही, असा टोला त्यांनी गुजरातप्रेमाबद्दल लगावला. नवीन पायाभूत सुविधा प्रकल्प, विशेष गुंतवणूक क्षेत्रे आणि आधुनिक उद्योगांचा फायदा सर्व हिंदुस्थानींना झाला पाहिजे, फक्त एका राज्याला नाही, असे ते म्हणाले. रमेश पुढे म्हणाले की, 80 वर्षांहून अधिक वर्षे मुंबईत असलेले वस्त्रोद्योग आयुक्तालय कार्यालय, कोणतेही ठोस कारण नसताना, गेल्या वर्षी अचानक दिल्लीला हलवण्यात आले. दत्तोपंत ठेंगडी नॅशनल बोर्ड फॉर वर्कर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंटदेखील 2021 मध्ये नागपुरातून दिल्लीला हलवण्यात आले. भाजपकडे दूरदृष्टी नाही. ते एकतर पंपन्या विकू शकतात किंवा धमक्या देऊ शकतात. आता बॉलीवूडला मुंबईपासून दूर उत्तर प्रदेशला नेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत, मात्र सर्व प्रकारचे दबाव आणूनही येथील चित्रपट उद्योग कुठेही हलायला तयार नाही, असे ते म्हणाले.

प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी हिंदुस्थानी म्हणून एकत्रितपणे विकासाच्या मार्गावर चालले पाहिजे यावर काँग्रेसचा नेहमीच विश्वास आहे, असे प्रतिपादन रमेश यांनी केले.

महाराष्ट्रावर अन्याय

महाराष्ट्र कोणत्याही नवीन प्रकल्पांना किंवा केंद्राच्या पाठिंब्याला पात्र नाही असा निर्णय भाजपने दुर्दैवाने आपल्या मालकांना खूश करण्यासाठी घेतला आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, पण आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र फक्त गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये स्थापन करण्यात आले आहे. 2006 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी मुंबईत ते उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते आणि बीकेसीमधील जमीनही आधीच निश्चित करण्यात आली होती, परंतु ती बुलेट ट्रेनसाठी पुन्हा वाटप करण्यात आली. महाराष्ट्रावर असा अन्याय सातत्याने सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. मोठय़ा औद्योगिक गुंतवणुकीही महाराष्ट्रातून गुजरातकडे वळवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.