
पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी जोडणाऱ्या नव्या बीकेसी कनेक्टर उड्डाणपुलावरून बेस्टच्या बसेसना परवानगी मिळाल्यानंतर तरी हार्बर मार्गावरील चुनाभट्टी रेल्वे स्थानकातील रेल्वे फाटक बंद करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अनेक रेल्वे फाटके अद्यापही बंद करण्यात यश न आल्याने लोकलच्या वेळापत्रकावर प्रचंड परिणाम होत आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलना रेल्वे फाटके शहरातील वाहनांच्या वाहतुकीसाठी वारंवार उघडी ठेवावी लागत असल्याने सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी लोकलच्या वेळापत्रकाला फटका बसत आहे. त्यातच हार्बर मार्गावर जाणाऱ्या बीकेसी कनेक्टर उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर येथील चुनाभट्टी रेल्वे फाटकाची गरज राहिलेली नसल्याने ते बंद करून लोकलचा प्रवास सुखकर करावा, अशी मागणी होत आहे. शिवडी, चुनाभट्टी आणि कुर्ला येथे रेल्वे फाटकांमुळे हार्बर मार्गावर सकाळ आणि संध्याकाळ ऐन गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनला फटका बसत आहे. बीकेसी कनेक्टर उड्डाणपूल चुनाभट्टी येथे हार्बर मार्गावरून जातो आणि रेल्वे फाटक चुनाभट्टी स्थानकाच्या उत्तर दिशेला आहे. आम्ही एमएमआरडीएकडे यासंदर्भात विचारणा करून रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय घेण्याविषयी अभ्यास करू, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
रेल्वे फाटकांमुळे लोकलची रखडपट्टी
अशा रेल्वे फाटकांना बंद करण्यासाठी उड्डाणपुलांच्या उभारणीची कामे रखडल्याने मध्य रेल्वेला जबर फटका बसत आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर कळवा, दिवा येथील रेल्वे फाटकांचा लोकल सेवेला दररोज फटका बसत असतो. येथे रेल्वेच्या हद्दीत उड्डाणपुलांचे काम झाले असले तरी पालिकेच्या हद्दीत पुलाला उतारासाठी जागा नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.



























































