बीकेएलकेपी, चेंबूर जिमखाना, जीएससी संघांना जेतेपद

जीएमबीए आणि विलिंग्डन स्पोर्टस्  क्लब आयोजित मोतीराम, उल्लाल आणि कानजी कप आंतरक्लब बॅडमिंटन स्पर्धेत बृहन्मुंबई क्रीडा ललित कला प्रतिष्ठानने (बीकेएलकेपी) सीसीआय अ संघाचा 2-0 असा पराभव करत मोतीराम कप एलिट ग्रुपचे विजेतेपद पटकावले. महिलांच्या उल्लाल व ज्युनियर्सच्या कानजी कप स्पर्धेत अनुक्रमे चेंबूर जिमखाना व गोरेगाव स्पोर्टस् क्लब संघांनी (जीएससी) बाजी मारली.

मोतीराम चषकासाठीच्या अंतिम फेरीत रविवारी अर्जुन सिंग आणि सुश्रुत करमरकर यांनी पहिल्या दुहेरीत विजय मिळवत बीकेएलकेपीला आघाडी मिळवून दिली. एकेरीमध्ये खेळणारा निगेल डीसा फॉर्म राखण्यात अपयशी ठरला. सोहम पाठकविरुद्ध त्याला 21-18, 21-14 असा धक्का बसल्याने सीसीआयला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांच्या गटात गार्गी देगवेकरने कमाल केली. तिच्याच जोरावर चेंबूर जिमखान्याने बाजी मारली. तिने दुहेरी आणि एकेरीत विजय मिळवत खार जिमखाना संघाला 2-0 असे रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.