
भाषावार प्रांतरचनेपासून म्हणजे गेल्या सहा दशकांपासून महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडणाऱया कर्नाटकातील मराठी भाषिक सीमाबांधवांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आज 1 नोव्हेंबर या कर्नाटक राज्योत्सवाच्या निषेधार्थ बेळगाव, खानापूर, निपाणी आदी सीमाभागात कडकडीत ‘काळा दिन’ पाळण्यात आला. कानडी पोलिसांच्या परवानगीची वाट न पाहता सकाळी काळी वस्त्र्ाs परिधान करून, छातीला व दंडाला काळ्या फिती बांधून तसेच काळे ध्वज फडकावत हजारोंच्या संख्येने सीमाबांधवांनी मूक सायकल फेरी काढली. यावेळी कितीही जोरजबरदस्ती केली तरीसुद्धा महाराष्ट्रात येण्यासाठी ठाम असल्याचे मराठी भाषिक सीमाबांधवांनी कर्नाटक राज्य प्रशासनाला ठणकावून सांगितले.
सन 1956 मध्ये भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवार अशी 865 मराठी भाषिक गावे जबरदस्तीने तत्कालीन म्हैसूर राज्यात घुसवण्यात आली. म्हैसूरचे कर्नाटक राज्य अस्तित्वात आल्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवाच्या माध्यमातून मराठी भाषिकांच्या जखमेवर जाणीवपूर्वक मीठ चोळण्याचा प्रकार कर्नाटक प्रशासनाकडून करण्यात येऊ लागल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून याच दिवशी कर्नाटक राज्यात डांबण्यात आल्याच्या निषेधार्थ मराठी भाषिक सीमाबांधवांकडून येथे सुतक पाळण्यात येऊ लागले. या दिवशी दैनंदिन व्यवहार बंद करून, काळी वस्त्र्ाs परिधान करून काळे ध्वज फडकवत सायकल फेरीतून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येऊ लागला. कानडी अत्याचाराचा जाच सहन करत आजही महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडणाऱया या मराठी भाषिकांची चौथी पिढी सीमा लढय़ात सक्रिय झाली आहे. मराठी संस्कृती जपण्यासाठी आजही सीमा बांधव तितक्याच उमेदीने लढा देत आहेत.
प्रतिवर्षीप्रमाणे आजही 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव, निपाणी, खानापूर आदी सीमाभागातील सीमालढा चळवळीचे केंद्र असलेल्या मराठी भाषिक गावांमध्ये ‘काळा दिन’ पाळण्यात आला. आपापले व्यवसाय बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळत हजारो आबालवृद्ध सीमाबांधव पारंपरिक मूक सायकल फेरीत सहभागी झाले. कर्नाटक पोलीस प्रशासनाच्या परवानगीची वाट न पाहता सीमाबांधवांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली ही विराट मूक सायकल फेरी काढली. सकाळी नऊच्या सुमारास धर्मवीर संभाजी महाराज उद्यानातून या मूक सायकल फेरीस सुरुवात झाली. यामध्ये काळी वस्त्र परिधान करून, छातीला, दंडाला काळ्या फिती बांधून तसेच काळे ध्वज फडकवत हजारोंच्या संख्येने आबालवृद्ध सीमाबांधव सहभागी झाले होते. रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून बेळगावचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यासह हजारो शिवसैनिक या फेरीत सहभागी झाले.
‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’ अशा घोषणांच्या फलकांद्वारे कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. तानाजी गल्ली, रेल्वे फाटक, फूलबाग गल्ली, भांदूर गल्ली, हेमू कलानी चौक, स्टेशन रोड, शिवाजी रोड, रामलिंगखिंड गल्ली, पाटील गल्ली, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल, बसवान गल्ली, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल या शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मुख्य सायकल फेरी मराठा मंदिरात दाखल झाली. या वेळी झालेल्या सभेत बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी अशा 865 मराठी भाषिक गावांसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा ठाम निर्धारही सीमाबांधवांकडून करण्यात आला. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, चंदगडचे आमदार राजेश पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर व समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगळे, राजू मरवे, बेळगावमधील माजी महापौर, उपमहापौर, नगरसेवक तसेच एकीकरण समितीच्या घटक समितीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
शिवसेना कायम सीमावासीयांच्या सोबतच – एकनाथ शिंदे
मूक फेरीची सांगता मराठा मंदिर येथील सभेने झाली. यावेळी शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी मोबाईलवरून सीमाबांधवांशी संवाद साधला. मराठी भाषिक सीमाबांधवांच्या हक्कांसाठी यापुढेही विधानसभेत आवाज उठवू अशी ग्वाही दिली; तसेच शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेना सदैव सीमाभागातील मराठी बांधवांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवत आहे. सीमालढय़ात 69 शिवसैनिक हुतात्मा झाले आहेत. यापुढेही सीमाबांधवांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी शिवसेना सदैव सीमाबांधवांच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब अजून किती हुतात्मे पाहिजेत?
आजच्या ‘काळा दिन’ मूक फेरीतून हजारो सीमाबांधव रस्त्यावर उतरले होते. वयोवृद्ध सीमाबांधवांनी पारंपरिक सायकलीचा वापर केला तर युवावर्ग मोटारसायकल घेऊन सहभागी झाला होता. विशेष म्हणजे सीमाभागातील चौथी पिढीसुद्धा या मूक फेरीत सहभागी झाली होती. ‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में…’ अशा घोषणा आणि फलकांनी लक्ष वेधले होते. याशिवाय सीमालढय़ात हुतात्मा झालेल्या सीमाबांधवांच्या प्रतिमेसह ‘1 नोव्हेंबर… केंद्र सरकारचा धिक्कार’ आणि ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब अजून किती हुतात्मे पाहिजेत’ असे फलक घेऊन सहभागी झालेल्या चिमुकल्या सीमावासीयांच्या फलकांनी विशेष लक्ष वेधले होते.
बेळगाव महाराष्ट्राचे…
ट्विटरवर आज मराठी भाषेत सीमाबांधवांकडून बेळगाव महाराष्ट्राचे हे हॅश टॅग वापरून सर्वांचे लक्ष वेधण्यात आले. सोशल मीडियाद्वारे सीमाभागातील युवावर्गाने याद्वारे सीमाप्रश्न जगाच्या कानाकोपऱयात पोहचविण्याचा प्रयत्न केला. अवघ्या काही तासांतच हजारो लोकांकडून याला प्रतिसाद मिळाला. रात्री ट्विटमध्ये कमालीची वाढ झाली.


























































