
सामना ऑनलाईन । कळवा
मानवी कवटी आणून त्याच्या सहाय्याने जंतरमंतर म्हणत काळी जादू करणाऱ्या अघोरींचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. कळव्यातील मफतलाल झोपडपट्टीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी धाड टाकून मानवी कवटीसह उल्हासनगरमधील अघोरी बाबा कैलास हटकर याच्यासह रामावतार शर्मा आणि पांडुरंग गवारी या तिघांना ताब्यात घेतले आहे.
कळवा येथील मफतलाल झोपडपट्टीत राहणाऱ्या रामावतार शर्मा याच्या झोपडीत गेल्या तीन महिन्यांपासून काहीतरी अघोरी कृत्य सुरू असल्याची कुणकुण कळवा पोलिसांना लागली. त्यानुसार पोलिसांनी या झोपडीत छापा मारला असता तेथे मानवी कवटी आणि जादूटोणासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळले. रामावतारला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने ही कवटी कैलास हटकर याच्याकडून सहा हजार रुपयांमध्ये विकत घेतल्याचे सांगितले. हे सर्व कृत्य त्याने उल्हासनगर येथे राहणारा व स्वतःला बाबा म्हणवून घेणाऱ्या पांडुरंग गवारी याच्या सांगण्यावरून केले असल्याची कबुली दिली. त्यानुसार या तिघांविरोधात अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अन्वये कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






























































