
शैलेश माळोदे, [email protected]
कृष्णविवर हा खगोलशास्त्रातील महत्त्वाचा विषय… प्रा. विश्वेश्वर यांचे याबाबत संशोधन फार महत्त्वाचे ठरते….
‘या पुढे माझं नाव ‘लुझी क्वासी मोडो’ असेल. कारण एलओयू म्हणजे विश्वाचा नायक आणि माझ्या नावाचा अर्थदेखील तोच म्हणजे ‘विश्वेश्वर’ आहे आणि ‘क्वासी नॉर्मल मोडस’ शोधण्यासाठी ‘क्वासी मोडो’ हा शब्द वापरतात. त्याचाही अर्थ तोच आहे.’’
हे शब्द होते प्रा. सी. व्ही. विश्वेश्वर यांचे. हिंदुस्थानचे ‘कृष्णविवर पुरुष’ (ब्लॅकहोल मॅन ऑफ इंडिया) म्हणून ओळखल्या जाणाऱया प्रा. विश्वेश्वर यांच्या मूलभूत संशोधनामुळे या सदरात त्यांच्याविषयी लिहिणं स्वाभाविक आहे. कारण ‘कृष्णविवर’ हा विषय सध्या खगोलशास्त्रात अत्यंत चर्चिला जाणारा असून त्याविषयी अनेक तरुणांना कुतूहल तर आहेच पण काही जण याबाबत अगदी जागतिक दर्जाचं संशोधन करत आहेत. तीन वर्षांपूर्वी म्हणजे 11 फेब्रुवारी 2016 रोजी जेव्हा ‘गुरुत्वलहरी’ शोध लागल्याचं जाहीर करण्यात आलं तेव्हा हिंदुस्थानला प्रा. विश्वेश्वर यांची पुन्हा एकदा महती पटली. विश्वेश्वर हे गुरुत्व लहरींचं गणितीय मोजमापन करणाऱया जगातील मोजक्या शास्त्रज्ञांपैकी एक होते. तेही 1970 साली. ‘नेचर’ या प्रथितयश शोधनियमकालिकात त्यांचा याबाबतचा शोधनिबंध प्रकाशित झाला होता. त्यावेळी कृष्णविवरांचं नामकरणही झालेलं नव्हतं. त्यांच्या मोजमापनात दोन कृष्णविवरं एकमेकांत मिसळून गेल्यावर बाहेर पडणाऱया संदेशाची आलेख स्वरूपातील मांडणी होती. लिगोने (लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरी) 2015 मध्ये शोधलेल्या ‘वेव्ह फॉर्म’सारखीच ती मांडणी होती.
प्रा. सी. व्ही. विश्वेश्वर हे पद्मश्रीप्राप्त, लेखक सी. के. वेंकटरामय्या यांचे पुत्र होते. त्यांनी बंगळुरूमध्ये एम.एस्सी (फिजिक्स) पदवी प्राप्त केल्यानंतर अमेरिकेतील मेरी लॅण्ड विद्यापीठातून ‘स्वार्झचाइल्ड ब्लॅकहोल्स’ या विषयात प्रा. चार्ल्स मिस्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी मिळविली. कृष्णविवरांच्या भौतिकशास्त्रात त्यांनी दिलेलं योगदान कृष्णविवरांच्या स्थैर्य आणि रचनेसाठी मान्यताप्राप्त संदर्भ म्हणून स्वीकारलं गेलंय. त्याचबरोबर कृष्णविवरांच्या थरथरण्याबाबतच्या ‘क्वासी नॉर्मल मोडस’च्या सैद्धांतिक शोधातही महत्त्वपूर्ण मानलं जातं. कृष्णविवर ही संकल्पना आता बऱयाचजणांना माहीत असली तरी सोप्या भाषेत कृष्णविवर म्हणजे अवकाशातील अशी वस्तू की, ज्याचं गुरुत्वबल इतकं प्रचंड असतं की, त्यामध्ये ओढला गेलेला प्रकाशही बाहेर निसटू शकत नाही.
विश्वेश्वर यांनी नंतर वैश्विक पार्श्वभूमीवर कृष्णविवरांचं अध्ययन केलं. ही कृष्णविवरे भौतिकशास्त्रविषयीचा फारसा अभ्यास न झालेला भाग आहे. आईन्स्टाईननं मांडलेल्या ‘जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’ संदर्भात त्यांनी आईन्स्टाईनचे फिल्ड समीकरण ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स, कॉम्पॅक्ट स्टेलार वस्तू, इनरशियल फोर्सेस आणि स्पेस टाईम बाबी योगदान दिलंय.
संशोधन कार्याची त्यांना विशेष आवड होती. जेव्हा गुरुत्व लहरींचा शोध लागला त्याविषयी समजावून सांगण्याची विनंती केल्यावर त्यांनी या प्रक्रियेला ‘कृष्णविवर आणि गुरुत्वलहरी यांचा विवाह’ असं संबोधलं. सुमारे 1.4 अब्ज वर्षांपूर्वी सूर्यापेक्षा अनुक्रमे 36 आणि 29 पट अधिक वस्तुमान असलेली दोन कृष्णविवरं एकमेकांच्या जवळ आली. नंतर वर्तुळाकार कक्षेत फिरताना एकमेकांत मिसळून गेली. या महाप्रचंड घटनेमुळे अवकाशाचं आणि वेव्हचं ‘फॅब्रिक’ थरथरलं त्यातून एक विशिष्ट डिस्टर्बन्स निर्माण झाला. हाच तो ‘लिगो’ने शोधलेला गुरुत्वलहरींचा शोध. या संदेशाचे तीन भाग होते. या वेव्हफॉर्मची नोंद ‘लिगो’ने केली. यापैकी शेवटचा भाग घंटा किणकिणण्यासारखा हळूहळू ‘फेड’ होत गेलेला म्हणजे ‘रिंग डाऊन’सारखा असतो. त्याचा अंदाज प्रा. विश्वेश्वर यांनी कृष्णविवरांच्या एकमेकांत मिसळण्याच्या संदर्भात 1970 साली उपपत्तीच्या स्वरूपात मांडला होता. तो आवाज कृष्णविश्वरांचा होता का? असं विचारल्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. ते म्हणाले, किणकिणणारी घंटा ही गुरुत्वलहरींसोबत केलेली सैद्धांतिक तुलना आहे. दोन कृष्णविवरे एकमेकांत मिसळताना कोणताही ध्वनी बाहेर पडत नाही, परंतु त्यांना गुरुत्वलहरींचा आलेखीय पुरावा पाहताना खूपच आनंद झाला. 11 फेब्रुवारी 2016 रोजी ही बातमी त्यांनी ऐकली आणि 45 वर्षांपूर्वींचा आपला अंदाज खरा ठरल्याचा खूप आनंद होऊन ते स्तब्ध झाले. ‘मी चिरंजीव आहे’ असं ते म्हणाले. कारण 1.4 अब्ज वर्षांपूर्वी उत्सर्जित झालेल्या लहरी ते बघू शकले.
बंगळुरूच्या नेहरू तारांगणाचे संस्थापक संचालक म्हणूनही त्यांनी अनेक कार्यक्रमाचे संहिता लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. खगोल भौतिकी त्यांनी अनेक लघुपटही निर्माण केलं. विज्ञान लोकप्रिय करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. ते शिक्षण क्षेत्रातही अग्रभागी होते. ते सोप्या भाषेत विज्ञानाचा प्रसार करणारे लेखक ही त्यांची ख्याती होती. ते एकदा म्हणाले, ‘जेव्हा मी एकदा इटलीच्या भेटीवर होतो आणि संसर्गामुळे माझा पाय दुखत होता तेव्हा मला गरम पाण्याच्या बुडबुडय़ांचा ‘बबल बाथ’ घेण्यास सांगण्यात आलं. मी तो घेत असताना मला वाटलं, हा कृष्णविवर बबल बाथ असता तर किती बहार आली असती’ ही संकल्पना मला खूप आवडली. नंतर मी कृष्णविवरांविषयी एक पुस्तक लिहिलं आणि त्याचं शीर्षक ठेवलं ‘आईन्स्टाईन्स एनिग्मा ऑर ब्लॅकहोल्स इन माय बबल बाथ’. त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकाचा हा मनोरंजक किस्सा त्यांची मिश्कील बाजू पुढे आणतो. हे पुस्तक खूपच रंजक आणि सोप्या भाषेतलं आहे. यात ऍरिस्टॉटल ते आईन्स्टाईनपर्यंतचा विश्व आणि गुरुत्वाविषयींच्या संशोधनाचा इतिहास आहे. 2015 साली त्यांनी ‘युनिव्हर्स अनव्हेल्ड – द कॉसमॉस इन माय बबल बाथ’ हे दुसरं पुस्तक लिहिलं.
बऱयाच जणांना ठाऊक नाही, परंतु प्रा. सी. व्ही. विश्वेश्वर यांनी विविध वैज्ञानिक विषयांवर आणि आईन्स्टाईनवरही अनेक व्यंगचित्रे प्रकाशित केली. त्यांनी आकाशवाणीवरून अनेक व्याख्यानंही दिली. ज्ञान, किचकट बाबींची सोपी मांडणी, विनोदबुद्धी आणि साधेपणा या त्यांच्या अंगभूत गुणांनी त्यांनी सर्वांना मोहीत केलं. त्यांचं गुरुत्वलहरींबाबतचं मूलभूत काम विज्ञानक्षेत्रात खूप मोलाचे ठरले आहे.

























































