मोदींच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांची प्रचंड गर्दी, भाषणासाठी तासभर ताटकळले पंतप्रधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-rally-in-raebareli

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीत जाहीर सभा घेतली खरी, पण त्या सभेला अपेक्षित गर्दी जमू न शकल्यामुळे व्यासपीठापासून दूरपर्यंत रिकाम्या खुर्च्यांचेच दर्शन सर्वांना घडले. विशेष म्हणजे सभेला आणखी लोक जमण्याच्या आशेपोटी पंतप्रधान मोदी यांनी तासभर प्रतीक्षा करीत उशिरा भाषण केले, पण गर्दीअभावी त्यांची निराशाच झाली.

पंतप्रधानांच्या या सभेत अखेरपर्यंत खुर्च्या मोठय़ा प्रमाणात रिकाम्याच राहिल्या. त्यामुळे मोदी यांचा प्रभाव ओसरू लागल्याच्या प्रतिक्रिया सभेनंतर रायबरेलीत उमटल्या आहेत. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेलीत होणाऱया अलोट गर्दीच्या सभांच्या तुलनेत मोदी यांची आजची सभा ‘फिकी’च वाटली, असे स्थानिक ज्येष्ठ पत्रकार उपेंद्र सिंह यांनी सांगितले.

आदित्यनाथ फेल
मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर साडेचार वर्षांत पहिल्यांदाच रायबरेली येथे आजच्या सभेसाठी आले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या सभेच्या ‘जय्यत’ तयारीची सारी सूत्रे स्वतःकडे ठेवली होती. सभा विक्रमी होण्यासाठी सरकारी यंत्रणाही कामाला जुंपण्यात आली होती, पूर्व तयारीवर आदित्यनाथ स्वतः देखरेख करीत होते, पण सभेसाठीचा मंडप आणि रिकाम्या खुर्च्या भरण्यात त्यांना यश काही आले नाही.

‘राफेल’मध्ये काका-मामा नसल्यानेच काँग्रेसचा भडका
आमच्या ‘राफेल’ करारात क्वॉत्रोची मामा आणि मिशेल काकाचा सहभाग नसल्यामुळेच काँग्रेसचा भडका उडाला आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आज हल्ला चढवला.

मोदी यांनी लालगंज येथे रेल्वे कोच फॅक्टरीला भेट दिल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीत सभा घेण्याची संधी साधली. त्यांची ही सभा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची नांदीच मानली जाते.

काही लोकांना भारतमातेचा जयघोषही रुचत नाही असे सांगून मोदी म्हणाले की, माझ्या बदनामीसाठी उतावीळ झालेल्या लोकांनी देशाच्या सुरक्षेच्या मुद्दय़ालाही तुच्छ समजले आहे. त्यांना लष्कर, संरक्षणमंत्री, संरक्षण मंत्रालय, फ्रान्सचे सरकार हे सगळेच खोरारडे वाटत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ‘राफेल’वर निकाल दिल्यानंतर त्या न्यायालयालाच आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे.

काँगेसवाले इथे भाषण करतात, टाळय़ा पाकिस्तानात वाजतात
काँग्रेसचे नेते इथे वक्तव्ये करतात, पण टाळय़ांचा कडकडाट पाकिस्तानात होतो. देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नाचा खेळ मांडल्याबद्दल त्यांना कोणत्या देशांचा पाठिंबा मिळतो हे काँग्रेसने सांगावे, असे मोदी यावेळी म्हणाले. ‘राफेल’ लढाऊ विमान खरेदी कराराच्या मुद्दय़ावरून वाद पेटवून काँग्रेस पुन्हा एकदा आपल्या जवानांचे मनोबल खच्ची करीत आहे असा आरोपही पंतप्रधानांनी यावेळी केला.