कल्याणमध्ये सभा मोदींची, चर्चा रिकाम्या खुर्च्यांचीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-rally-kalyan-chair

सामना प्रतिनिधी । कल्याण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याणमध्ये आज मेट्रोच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी प्रचंड गर्दी होईल अशा आशेवर असलेल्या भाजपची घोर निराशा झाली. कारण कल्याणकरांनी मोदींच्या सभेकडे पाठ फिरवल्याने असंख्य खुर्च्या रिकाम्याच राहिल्याचे पाहायला मिळाले.

नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी म्हणून भाजपने जागोजागी बॅनरबाजी केली होती. मात्र त्याला कल्याणकर प्रवाशांनी उत्तर देत कल्याण रेल्वे स्थानकावर गाजराची तोरणं, काळ्यापताका लावल्या. त्यामुळे मोदींच्या या सभेविषयी काय भावना आहेत हे आधीच स्पष्ट दिसत होते. त्यानंतर मोदींच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी जोर लावणाऱ्या भाजपच्या पदरी घोर निराशाच आली. सोशल मीडियावर पोस्टबाजी आणि गल्लीबोळातील बॅनरबाजीला भुलून लोक मोदींच्या भाषणाला हजेरी लावतील अशी आशा भाजपला होती. पण प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही. कार्यक्रमावेळी खुर्च्या रिकाम्याच राहिल्या. त्यामुळे मोदींच्या भाषणाऐवजी रिकाम्या खुर्च्यांची जोरदार चर्चा कल्याण आणि परिसरात ऐकायला मिळत आहे.

रायबरेलीची पुनरावृत्ती

‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीत मोदींनी नुकतीच जाहीर सभा घेतली होती. पण त्या सभेला अपेक्षित गर्दी जमू न शकल्यामुळे व्यासपीठापासून दूरपर्यंत रिकाम्या खुर्च्यांचेच दर्शन सर्वांना घडले होते.

modi-rally-in-raebareli