आशीर्वाद

>> शिरीष कणेकर

नंदुरबारहून मला एका उच्चशिक्षित, उच्चपदस्थ माणसाचा नियमितपणे फोन येत असतो. तो सुरुवातच ‘यॉर्कर’ने करतो – ‘मला तुमचा आशीर्वाद हवाय.’ पहिल्या खेपेला मला तो राँग नंबर वाटला. ‘माझा कशाला कोण आशीर्वाद मागेल? पोटची पोरं नाही मागत. सिनसिनाटीहून मी मुलाकडून निघालो आणि टॅक्सीत बसण्यापूर्वी थोडा घुटमळलो. वाटलं होतं की तो पाया पडेल. शेवटी मी त्याला विचारलंदेखील – ‘काही पायाबिया पडण्याचा विचार?’
‘अरे बापरे!’ तो उद्गारला. ‘मला वाटलं तुम्ही पाया पडताय.’
मी काही नं बोलता तिथून ‘रफा दफा’ झालो. आता वाटतं की मी त्याच्या पाया पडायला हरकत नव्हती. कोण होतं बघायला? आणि बघितलं तरी काय, शिक्षणाने, ज्ञानाने व कर्तृत्वाने तो माझ्यापेक्षा मोठाच नव्हता का? सर्वसाधारणपणे तो माझ्या पाया पडतो हा त्याचा मोठेपणा, चांगूलपणा. वरना मैं किस खेत की मुली हूं?
नंदुरबारवाल्याचा फोन आला की त्याच्या सलामीच्या वाक्यानेच तो फोन त्याचा आहे हे मला कळतं. तो म्हणतो – ‘मला तुमचा आशीर्वाद हवाय.’ हा गृहस्थ बहात्तर वर्षांचा, मी पंचाहत्तरचा. तीन वर्षांच्या अधिक्यामुळे मला आशीर्वाद देण्याचा अधिकार प्राप्त होतो? मी ऐंशी-पंचाऐंशी असतो तर त्यानं माझ्या पायाचं तीर्थच प्राशन केलं असतं. मला रोज नंदुरबारला एक पदतीर्थाची बाटली पाठवावी लागली असती. आयुष्यात मला कोणी आशीर्वाद मागितलेला नाही आणि हा आता कुठे नंदुरबारला उपटला? ‘माझे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत’ असे सांगत मी हे आशीर्वादाचे खाते बंद करायचा अयशस्वी प्रयत्न केला. पण रामा शिवा गोविंदा. तो म्हणायचाच – ‘मला तुमचा आशीर्वाद हवाय.’ माझ्या हेही मनात आलं की त्या भागात पैशाला तर आशीर्वाद म्हणत नसतील? आता सुसंगती लागते. पाया पडणं व आशीर्वाद देणं हे आता समाजजीवनातून हद्दपार झालंय. परीक्षेला जातानाही पोरं आईबापांच्या पाया पडत नसावीत. मग बकरीसारखी तुळशीची पानं ओरबाडून खाणं लांबच राहिलं. कोणाच्या घरात कुंडीत तुळस असते? ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ असं कुठली नवरीमुलगी म्हणते? मुळात कितीशा मुलांकडे अंगण असतं? आशीर्वाद मागून नंदुरबारवाला माझा सन्मान करीत असेलही, पण नकळत अभावितपणे तो हुतात्मा शिरीषकुमारचा अवमान करीत नव्हता का? एकदा मी त्याला म्हणालो – ‘माझे बंधूही घरी आलेत. ते तुमच्यापेक्षा लहान आहेत. तरीही त्यांनी तुम्हाला आशीर्वाद कळवलेत. स्वीकार व्हावा.’
त्याने कृतज्ञतापूर्वक आमच्या कौटुंबिक आशीर्वादाचा स्वीकार केला. कुजकटपणा मर्मी लागला नाही तर तो करण्यात काय हशील, हे सत्य मला उमगले.
एकदा एक अनोळखी माणूस माझा पत्ता काढून माझ्याकडे मला आशीर्वाद द्यायला आला. मी अवाक् झालो. मला आशीर्वादांची नितांत गरज आहे अशी गावात आवई उठली होती की काय? त्यापेक्षा हे भडभुंजे रक्तदानासारखं पुण्याचं काम का करीत नाहीत? नको नको, नाहीतर मी न्याहारीला चिकन सूप घेत असताना हे मला रक्त द्यायला यायचे, कोंबडीच्या रक्तात माणसाच्या रक्ताची भेसळ नको. कोंबडीला आवडणार नाही.
‘तुमच्या आशीर्वादानं काय काय होऊ शकतं किंवा काय काय झालंय हे तुम्ही सांगू शकाल का?’ मी विनम्रपणे विचारले, ‘आफ्टर ऑल तो मला स्वेच्छेनं आशीर्वाद द्यायला आला होता.
‘माझ्या आशीर्वादानं शारदा पार्श्वगायिका झाली होती. एरवी तिची गाण्याची योग्यता होती का?’
‘आणखी काही उदाहरणे?’
‘म्हणाल तेवढी. मी टीना मुनीमला आशीर्वाद दिला आणि तिला कोटय़धीश पती मिळाला. मी विजय मल्ल्याला आशीर्वाद दिला आणि तो देशाबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाला. मी के. एल. राहुलला आशीर्वाद दिला व सातत्याने अपयशी होत असतानाही त्याचं संघातील स्थान अबाधित राहिलं. मी मनोज कोटकला आशीर्वाद दिला आणि त्या मतदारसंघातून किरीट सोमय्याचा पत्ता कट झाला. मी सनी लिऑनला आशीर्वाद दिला आणि पुढला वस्त्र्ाहीन इतिहास सगळय़ांच्या तोंडी आहे. मी सयाजी शिंदेला आशीर्वाद दिला आणि त्याला दक्षिणेत धडाधड चित्रपट मिळू लागले. मी सुरेश कलमाडींना आशीर्वाद दिला आणि त्यांचे बारा वाजले. (एरवी ते धुळीस मिळाले असते) मी केदार जाधवला आशीर्वाद दिला आणि याच्या जखमा लवकर भरून आल्या. मी सचिन तेंडुलकरला आशीर्वाद दिला आणि त्याचा मुलगा अर्जुन इतपत तरी खेळू शकला. मी सानिया मिर्झाला आशीर्वाद दिला आणि तिचं फोफावत जाणं आटोक्यात आलं.
‘तुम्ही मला आशीर्वाद दिल्यानं माझं काय भलं होईल?’ मी उत्साहाने थरथरत्या आवाजात माझ्या अनाहुत, अनोळखी उपकारकर्त्याला विचारलं.
‘तुम्ही लेखक आहात.’ तो हळुवारपणे म्हणाला.
‘हो’. मी सुखावत म्हणालो.
‘माझ्या आशीर्वादानंतर तुम्ही चांगलं लिहायला लागाल.’
मी त्याचा आशीर्वाद न घेताच त्याला घरातून बाहेर काढले. मी बरोबर केलं की चूक आजही मला कळत नाही. एकदा वाटतं मी त्याचा आशीर्वाद घ्यायला हवा होता. (नाहीतरी फुकटच होता.) कोणी सांगावं, माझं लेखन सुधारलंही असतं. अनेकांचं लेखन वाचून माझ्या मनात येतं की या साल्यांनीही आशीर्वाद घेतला नसावा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या