
अंध व्यक्ती वॉकिंग स्टीकच्या मदतीने चालतात, जेणेकरून मार्गात काही अडथळे आले तर त्यांना समजते. हेच काम जर पायातील बुटांनी केले तर… ऑस्ट्रिया देशातील टेक इनोव्हेशन या कंपनीने असेच स्मार्ट बूट बनवले आहेत, जे वॉकिंग स्टीकची जागा घेऊ शकतील. ‘इनोमेक’ असे या बुटांना नाव देण्यात आले आहे. हे बूट घालून चालताना अंध व्यक्तींना चार मीटर अंतरापर्यंतचे अडथळे समजू शकतील. समोर भिंत आली किंवा एखादी गाडी वा जिना आला तर समजू शकेल.
इनोमेक या स्मार्ट शूजमध्ये अल्ट्रासोनिक सेन्सरचा वापर केलेला आहे. बूट घालणाऱयाला अडथळ्यांबाबत इशारा मिळतो. ब्लू-टूथला जोडलेल्या स्मार्टफोनवर अलार्म वाजतो. त्यामुळे बूट वापरणारा सतर्क होतो. डिव्हाईसच्या मागे असलेले बटण दाबून चार मीटरपर्यंतच्या अंतरसीमा निश्चित करता येतात.
स्मार्ट शूजची किंमत जास्त आहे. त्यामुळे ती सर्वांना परवडेल असे नाही. टेक इनोव्हेशन कंपनीने ऑस्ट्रियाच्या ग्राज युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीसोबत भागीदारी करून या शूजची निर्मिती केली आहे. त्यामुळे सेन्सर आणि कॅमेऱयांनी टिपलेल्या माहितीच्या आधारे कोणता भाग चालण्यासाठी सुरक्षित आहे, तेदेखील समजेल.























































