
बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण आठ शैक्षणिक वर्षातील सुमारे 10 लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात येत आहेत, अशी माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली.
‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना नवाब मलिक म्हणाले, बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार असून उद्योगांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करणे सुलभ होणार आहे. शिवाय योग्य उमेदवारांची होणारी गैरसोय रोखली जाणार आहे. हे तंत्रज्ञान क्रॉसफोर्स सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारा विकसित करण्यात आले असून या प्रणालीच्या मदतीने डिजिटल कागदपत्रे 10 सेपंदांत जगभरातून कोठूनही ऑनलाइन पडताळणी करता येऊ शकतील. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत घेण्यात आलेल्या स्टार्टअप मेळाव्यातून ही संकल्पना पुढे आली असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रमाणपत्रांच्या हाताळणीसाठी वापरले जाणारे मंडळाचे मनुष्यबळ आणि त्यांच्या वेळेचीही बचत होणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.



























































