ब्लॉग : मनमौजी राजा!

jyotsna-gadgil>>ज्योत्स्ना गाडगीळ

किमान आज तरी…
आज तरी त्यांचं दर्शन होणार नाही, असं वाटलं होतं. तरी ते दिसलेच! ‘१०२ नॉट आउट’ मधल्या ऋषी कपूरसारखे वयोवृद्ध गृहस्थ. सत्तरी ओलांडलेली असावी. तरी तब्येत टुणटुणीत.
लालसर रंगाचा खादीचा हाफ शर्ट, हिरवट काळ्या रंगाची पॅण्ट, स्पोर्ट्स शूज, आधुनिक फ्रेमचा चष्मा, डोक्याची गोलाई स्पष्ट दिसू शकेल इतपत केस, खोटी दंतपंक्ती, आधारासाठी हातात फायबरची काठी आणि गोऱ्यामोऱ्या चेहऱ्यावरील मिस्कील भाव. म्हटलं, तर बघून प्रसन्न वाटावं असं व्यक्तिमत्त्व. पण त्यांना पाहून नेमकं उलट व्हायचं!
रोज सकाळच्या धावपळीत अंशपोटी ऑफिस गाठताना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या ठेल्यावर त्यांचं दर्शन व्हायचं. आज श्रावणी सोमवार, निदान आज तरी हे दिसणार नाहीत असं वाटलं होतं, पण कसलं काय! रिक्षास्टँडच्या समोरच्या टपरीवर कांदे भजीचा फडशा पाडत ते बसले होते. मला पाहताच त्यांनी कचकन एक मिरची दाताखाली तोडली. कांदा भजीच्या वासाने माझी भूक चाळवली. ‘शिव शंभो’ म्हणत धुसफूसत मी मान वळवली.
रिक्षा सुटण्याआधीच रिक्षावाल्याने पैसे गोळा करण्यासाठी हात पुढे केला. माझ्याकडे नेमके सुटे पैसे नव्हते. उपास मोडू नये, म्हणून नाकावर रुमाल ठेवून मी समोरच्या टपरीवर गेले. पैसे सुटे करण्यासाठी नोट पुढे केली, तर हे म्हणतात कसे…
‘खाद्यपदार्थाच्या दुकानासमोर नाकाला रुमाल धरून उभे राहणे, हा त्या दुकानाचा अपमान असतो. कळल्ये…ह्या…ह्या…ह्या!’
चारचौघात टोमणा मारत, वरून हास्याची मोठ्याने ‘तिहाई’ दिल्याने मी अवघडले. टपरीवरच्या मावशी काहीतरी विकत घेतल्याशिवाय सुटे पैसे द्यायला तयार नव्हत्या. नाईलाजाने मी साबुदाणा वड्याची ऑर्डर दिली आणि पार्सल मिळेपर्यंत त्यांच्या बाजूला ठिय्या मारून बसले. आपणहून ओळख देत ते गृहस्थ म्हणाले,
‘मायसेल्फ दिवेकर, रिटायर्ड फ्रॉम सेंट्रल रेल्वे, क्लास वन ऑफिसर!’
त्यावर माझी उसनी स्माईल!
‘तुम्ही आमच्या सेंट्रल रेल्वेच्या पाहुण्या दिसताय, त्यातही पत्रकार दिसताय.’
मी रिन सफेदीचा ‘चौंक गये’ वाला चेहरा करताच ते म्हणाले,
‘अशी कुत्तरओढ सेंट्रल वाल्यांच्या पाचवीला पुजलेली असते, त्यावरून ओळखलं. शिवाय तुम्ही रोज मला बघून जो प्रश्नार्थक चेहरा करता, तो पाहता मला डाऊट आला, तुम्ही नक्की पत्रकार असणार म्हणून! त्यांनाच सवय असते अशी प्रत्येकाकडे संशयाने बघण्याची!’
‘हो, आहे मी पत्रकार, पण ‘बाईट’ घेणारी पत्रकार नाही, ‘कोट’ घेणारी पत्रकार, आय मिन प्रिंट मिडियातली पत्रकार!’
‘कोण वाचतं आता पेपरातलं तत्वज्ञान? असा होतो तुमच्या पेपरचा वापर… भजीच्या पुड्या बांधण्यासाठी…ह्या…ह्या…ह्या!’
‘निरीक्षण छान आहे तुमचं आणि या वयात पचनशक्तीही छान दिसतेय.’
‘अगदी बरोब्बर बोललात. पचनशक्ती चांगलीच आहे माझी. टचवुड करा. मी रोज सकाळी ‘राजा’सारखा नाश्ता करतो, दुपारीही ‘राजा’सारखा जेवतो आणि रात्रीसुद्धा ‘राजा’सारखाच जेवणावर ताव मारतो. ह्या…ह्या…ह्या!’
‘हं…चांगलंय.’
‘हो तर, चांगलंच आहे. सत्तरी ओलांडली. आता एकही इच्छा मागे ठेवायची नाहीये. आमची ही…आयुष्यभर मेनू कार्डची उजवी बाजू बघत बघत गेली. पगारही कमीच होता म्हणा. निभावलं बिचारीनं. मी ही उमेदीच्या काळात पार्लेजीच्या पुड्यावर दिवस काढले. पण रिटायर्ड होता होता, पोस्ट वाढली आता पेन्शन मिळतंय भरघोस. त्यात सातवं पे कमिशन येऊ घातलंय. करायचाय काय तो पैसा मागे ठेवून? औषधात घालण्याऐवजी आवडीच्या पदार्थात घालतो. भरपूर चालतो, व्यायाम करतो, खाल्लेलं सगळं पचवतो आणि राजासारखं जगतो. एखादा भिकारी दिसला, तर त्याच्याही हातावर पैसे न ठेवता गरमागरम भज्यांची पुडी ठेवतो. तो दुवा देतो, मी आणखी जगतो. एवढंच काय, ह्या मावशी आहेत नं, त्यांना सांगून ठेवलंय…मी मेलो की माझ्या पिंडाजवळ एक भजीची पुडी ठेवा, त्याशिवाय कावळा टोच मारणार नाही…ह्या…ह्या…ह्या’
‘मला वाटलं आज श्रावणी सोमवारचा उपास असेल…त्यामुळे आज काही तुमचं दर्शन होणार नाही.’
‘छे छे! करायचे तेव्हा भरपूर उपास केले, भरपूर पुण्य कमावलं, आता बोनस म्हणून मिळालेलं आयुष्य ‘पोटभर’ जगतोय!’
‘फारच खवय्ये दिसताय!’
‘प्रत्येकाने असायला हवं, म्हणजे सकाळी सकाळी इतरांकडे असूयेने बघण्याची वेळ येत नाही. कस्यें…ह्या…ह्या…ह्या!
‘बरं, पार्सल आलं माझं. मीही येते आता. ‘कुत्तरओढ’ करत ऑफिस गाठायचं आहे.’
‘हो हो! अगदी! मुलाखती घ्या, तत्वज्ञान छापा, बातम्यांची सर’मिसळ’ करा, पण पेपर काढा. नाहीतर आम्ही भजे कशातून खाणार? ह्या… ह्या…ह्या…’

summary- blog by jyotsna gadgil on old man

आपली प्रतिक्रिया द्या