
गणेश गल्ली येथील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ (मुंबईचा राजा)च्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 1664 जणांनी रक्तदान केले. नववर्षाच्या सुरुवातीलाच हे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. गेली 25 वर्षं मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे.
मंडळाच्या वतीने संकलित रक्त मुंबईतल्या नायर, शीव, वाडिया, जे. जे., केईएम आणि जसलोक रुग्णालयातील रक्तपेढींमध्ये पाठवण्यात आले. या शिबिरात नोंदणीकृत दात्यांनीच रक्तदान केले. विशेष म्हणजे कोरोना लसींचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच या शिबिरात रक्तदान करण्याची मुभा देण्यात आली होती. रक्तदानाच्या ठिकाणी राज्य सरकारने घालून दिलेल्या कोविडच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. मंडळाच्या वतीने सर्व रक्तदात्यांना भेटवस्तूसह प्रमाणपत्रही देण्यात आले. शिबिराला आमदार अजय चौधरी, शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी, नगरसेवक अनिल कोकीळ, सचिन पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या वतीने अध्यक्ष किरण तावडे यांनी मान्यवरांसह सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

























































