
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि अद्ययावत सुविधा देणाऱ्या पालिकेने शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेलेल्या तब्बल चार हजार विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. या विद्यार्थ्यांना कौटुंबिक कारणे आणि इतर काही कारणांमुळे शिक्षण सोडावे लागले होते.
पालिका शाळांमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्यांना पालिकेकडून 27 शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. शिवाय बेस्टचा प्रवासही मोफत आहे. गेल्या काही वर्षांपासून पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केल्यामुळे गेल्या वर्षी 35 हजार तर या वर्षी तब्बल 1 लाख 25 विद्यार्थी वाढले आहेत. त्यामुळे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या आता 2 लाख 98 हजारांवरून चार लाखांच्या वर गेली आहे. दरम्यान, मागील शैक्षणिक वर्षांत विविध कारणाने सुमारे चार हजार विद्यार्थी शाळांतून गळती झाल्याची माहिती समोर होती. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोधमोहीम घेऊन यातील बहुतांशी विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
…म्हणूनच ‘ते’ विद्यार्थी शिक्षण प्रवाहाबाहेर
कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे शाळा बंद होत्या. ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात होते. पालिका शाळांतील काही मुलांचे पालक मोलमजुरी करणारे असल्याने कोरोनाच्या काळात रोजगार गेल्याने अनेकजण आपल्या मूळगावी स्थायिक झाले. तर इतर कारणांनी अनेकजण स्थलांतरित झाले. त्यामुळे अनेक मुलांची शाळा बुडाली. त्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात सुमारे चार हजार विद्यार्थी गळती झाली होती.



























































