
मालमत्ता कर चुकवणाऱयांना चांगला धडा शिकवण्यासाठी पालिकेने आता अधिक कडक पावले उचलायला सुरुवात केली असून जलवाहिन्या तोडल्याबरोबरच आता मलनिःसारण वाहिन्या तोडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अशा करचुकवेगिरी करणाऱयांचे आता ‘सगळेच वांदे’ होणार आहेत. मुंबईत आज 4 ठिकाणी मलनिःसारण वाहिन्या तोडण्यात आल्या तर अन्य 4 ठिकाणी साहित्य जप्त करण्यात आले आणि काही ठिकाणी सील करण्याची कारवाई करण्यात आली.
केंद्र सरकारने महापालिकांचा जकात आणि इतर कर रद्द केल्यानंतर देशभरात जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली. त्यामुळे आता मुंबई महापालिकेची सर्व भिस्त मालमत्ता करावर असून मालमत्ता कर थकवणाऱयांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. थकबाकीदारांना डिसेंबर 2020पासून बिले पाठवण्यात आली असून यात व्यावसायिक तसेच रहिवासी संकुलांचा समावेश आहे. ‘मालमत्ता कर’ थकवणाऱयांविरोधात मलनिःसारण वाहिनी, जलजोडणी तोडणे, जप्ती करणे, मालमत्ता सील करणे यासारखी दंडात्मक कारवाई केली जात आहे.
पालिकेच्या काही महत्त्वाच्या कारवाया
- अंधेरी पश्चिममध्ये हॉटेल झिलीओन या मालमत्तेवर 8 कोटी 70 लाख 58 हजार 738 रुपये इतकी थकबाकी होती. त्यामुळे या मालमत्तेची मलनिःसारण वाहिनी खंडित करण्यात आली. z अंधेरीच्या झवेरी कन्स्ट्रक्शन प्रा. लि.च्या 65 लाख 39 हजार 518 रुपये एवढी थकबाकी होती. येथील कार्यालयीन उपयोगाचे साहित्य जप्त करण्यात आले.
- वांद्रय़ाच्या शक्ती सदन बी विंगमधील कार्यालयावर मालमत्ता कराची रुपये 94 लाखांची थकबाकी होती. हे कार्यालय सील करण्यात आले.
































































