21 दिवसांत आढळून आले हिवतापाचे 509 रुग्ण, तर डेंगीचे 105 रुग्ण; काळजी घेण्याचे महानगरपालिकेचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 ते 21 ऑगस्ट 2022 या केवळ 21 दिवसांच्या कालावधी दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात हिवतापाचे (मलेरिया) 509 रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधी दरम्यान डेंगीचे 105 रुग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही आजारांचा प्रसार हा डासांमुळे होतो. यापैकी हिवताप या आजाराचा प्रसार ‘एनोफिलीस’ डासांमुळे, तर डेंगीचा प्रसार ‘एडिस’ डासांमुळे होतो. या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या काही थेंब पाण्यामध्येही होऊ शकते. उदाहरणार्थ बाटलीचं झाकण, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, वातानुकूलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोप कुंड्यांखालील ताटल्या यासारख्या विविध वस्तुंमध्ये साचलेल्या काही थेंब पाण्यातही उत्पन्न होणारे डास; हे डेंगी (Dengue), हिवताप (Malaria) यासारख्या घातक रोगांच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतात. त्याचमुळे पाणी साचेल अशा वस्तू सातत्याने हटविणे व त्यात साचलेले पाणी नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार दिली आहे.

या अनुषंगाने अधिक माहिती देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कीटकनाशक खात्याचे अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थळे आढळून आल्यास ती नष्ट करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे व कीटक नियंत्रण खात्याद्वारे सातत्याने कार्यवाही करण्यात येते. तथापि, या अनुषंगाने सर्व नागरिकांनी आपापल्या घरामध्ये व सोसायटीच्या आवारात पाणी साचण्याची ठिकाणे असणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने आपल्या घरातील व घराच्या लगतच्या परिसराची नियमितपणे पाहणी करणे गरजेचे आहे. तसेच या पाहणी दरम्यान बाटलीचं झाकण, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, वातानुकूलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोप कुंड्यांखालील ताटल्या यासारख्या बाबी व त्यामधले साचलेले पाणी तात्काळ नष्ट करणे गरजेचे आहे. जेणेकरुन, त्यामध्ये डासांची पैदास होणार नाही.

डेंगीच्या विषाणूंचा प्रसार करणारे व मलेरियाचे परजीवी पसरविणारे डास कोणते?

डेंगीच्या विषाणूंचा प्रसार करणाऱ्या ‘एडीस इजिप्टाय’ (Aedes aegypti) डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. तर मलेरियाच्या बाबतीत मलेरियाचे परजीवी (Plasmodium Species) पसरविणाऱ्या ‘ऍनॉफिलीस स्टीफेन्सी’ (Anopheles Stephensi) डासांची उत्पत्ती देखील स्वच्छ पाण्यातच होते. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान घरात व घराशेजारील परिसरात साचलेल्या चमचाभर पाण्यातही डेंगी व मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळून येतात. हे लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या घरात – कार्यालयात आणि घराच्या व कार्यालयाच्या परिसरात पाणी साचू शकतील, अशी ठिकाणे काळजीपूर्वक शोधून ती तत्काळ नष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे.

साचलेले पाणी का नष्ट करावे?

साचलेल्या पाण्यात डासांची मादी एकावेळी सुमारे 100 ते 150 अंडी घालते. या अंड्यांमधून डास उत्पन्न होण्यास साधारणपणे आठवड्याभराचा कालावधी लागतो. हे लक्षात घेता, दर आठवड्यात किमान एकदा तरी आपल्या घरातील पाणी साठविण्याच्या भांडी, टाकी इत्यादींसह सोसायटीच्या व कार्यालयाच्या परिसराची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. या अंतर्गत आपल्या सोसायटीचा परिसर, सोसायटीतील बंद घरे, लिफ्टचे डक्ट, इमारतीची गच्ची इत्यादी विविध ठिकाणांची आठवड्यातून एकदा नियमितपणे तपासणी करुन तिथे पाणी साचलेले नसल्याची खात्री करुन घेणे, पाणी साचलेले आढळून आल्यास ते काढून टाकणे वा नष्ट करणे; अत्यंत आवश्यक आहे.

आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून का पाळावा?

साचलेल्या काही थेंब पाण्यातही डास अंडी घालतात. ही बाब आता आपणा सर्वांनाचा माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील विविध प्रकारच्या निरुपयोगी वस्तू शक्य तितक्या लवकर नष्ट करुन महानगरपालिकेला सहकार्य करावे. त्याचबरोबर अनेक घरांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप वा ड्रम ठेवलेले असतात. यातील पाण्यात डेंगी आजार पसरविणा-या डासांच्या अळ्या वेळोवेळी मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. याकरिता हे पिंप व इतर पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडी ठेवून आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा. या दिवशी पाणी साठवण्याची भांडी – पिंप इत्यादी प्रथम पूर्णपणे उलटे करुन ठेवावीत. त्यानंतर काही वेळाने हे पिंप व इतर भांडी कोरड्या व स्वच्छ कापडाने आतून पुसावीत. भांडी कोरड्या व स्वच्छ कापडाने पुसत असतांना ती दाब देऊन पुसावीत, जेणेकरुन पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील.

बातमीबाबत महत्त्वाची व वैशिष्ट्यपूर्ण माहिती

डासांचे आयुष्य हे साधारणपणे तीन ते सहा आठवड्यांचे असते. या आयुष्यात डासाची मादी साधारणपणे तीन वेळा अंडी घालते. प्रत्येक वेळी साधारणपणे 80 ते 100 अंडी घातली जातात. ही अंडी शुष्क अवस्थेतही साधारणपणे वर्षभरापर्यंत राहू शकतात. तदनंतर जेव्हा पाण्याशी संपर्क येईल, तेव्हा ही अंडी फलित होऊ शकतात.

मलेरिया व डेंगी पसरविणा-या डासाची मादी ही आपली अंडी स्वच्छ व साचलेल्या पाण्यातच घालते. ही अंडी घालण्यासाठी चमचाभर साचलेले पाणी देखील पुरेसे असते. अंडी घातल्यापासून साधारणपणे आठवड्याभरात डासांची उत्पत्ती होते.

फुलांचे परागकण, फळे वा इतर शर्करा असणारे पदार्थ हे नर डासांचे प्रमुख अन्न मानले जाते. तर रक्त हे मादी डासांचे अन्न असते व त्यामधील प्रथिनांची अंडी तयार होण्याकरिता आवश्यकता असते. या प्रथिनांसाठी डासाची मादी मानवाला चावते.

मलेरिया, डेंगी यासारख्या रोगांचे परजीवी / विषाणू हे डासांच्या शरीरात असू शकतात. परजीवी / विषाणू वाहक असणारी डासाची मादी मानवाला चावल्यास त्या रोगांचे मानवात संक्रमण होते. डेंगीचे संक्रमण करणारी डासाची मादी ही मानवाला साधारणपणे दिवसा चावते, तर मलेरियाचे संक्रमण करणारी डासाची मादी ही बहुतांशी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान चावते.

डास चावू नये यासाठी मच्छरदाणीचा वापर करणे, मलम वापरणे, शरीर अधिकधिक झाकले जाईल असे कपडे वापरण्यासारख्या बाबींचा अवलंब करावा. तसेच महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खाते व कीटक नियंत्रण खात्याद्वारे वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचनांचे कसोशीने पालन करावे.