पालिका अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरी, पाच महिन्यांनंतर पहिली ऑनलाइन सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - संदीप पगडे

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर, गेल्या पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पालिकेच्या वर्ष 2020-21च्या 33 हजार 441.02 कोटींच्या अर्थसंकल्पाला आज सभागृहाने मंजुरी दिली. त्यासाठी ऑनलाईन सभागृह सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतही विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला न जुमानता महापौर किशोरी पेडणेकर यांनी अर्थसंकल्प मंजूर केला.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात सादर करण्यात आला. मात्र, 22 मार्चला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे हा अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी पालिका सभागृहात मांडता आला नव्हता. त्या पाश्र्वभूमीवर, आज सभागृह बोलावण्यात आले होते. सभा सुरू होताच भाजपचे प्रभाकर शिंदे यांना बोलायचे होते. मात्र, महापौरांनी त्यांना परवानगी न दिल्यामुळे गोंधळाला सुरुवात झाली. नियमाप्रमाणे प्रथम विरोधी पक्ष नेते रवी राजा बोलतील, मग तुम्हाला बोलायला देते, असे महापौरांनी सांगितल्यानंतर गोंधळ थांबला. रवी राजा यांचे बोलणे सुरू झाल्यावर बोलणे ऐकू येत नाही, असे सांगत भाजप नगरसेवकांनी पुन्हा गोंधळाला सुरुवात केली. विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्याने महापौरांनी अर्थसंकल्प मंजूर करत सभागृह तहकूब केले.

नियमाप्रमाणेच निधीचे वाटप – महापौर

‘निधीचे समान वाटप कधीच होत नाही तर नियमांप्रमाणे निधीचे वाटप करण्यात येते. आम्ही प्रत्येक नगरसेवकाला योग्य तो निधी दिला आहे कारण मुंबईसाठी काम करणारा कोणत्याही पक्षातील नगरसेवक असला तरी त्याला एक सहकारी म्हणून मदत करणे आवश्यक आहे. स्थायी समिती, महापौर निधीतूनही त्यांना बर्‍यापैकी फंड दिला आहे. ज्यांनी वैयक्तिकपणे मागणी केली त्या नगरसेवकांनाही फंड दिला आहे. इतकेच नव्हे तर विरोधी पक्षांना मागच्या वर्षापेक्षा चांगला निधी दिला आहे. त्यामुळे कमी निधी दिला, हा विरोधी पक्षाचा आरोपच साफ चुकीचा आहे’, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.