
मुंबई महानगरपालिकेकडून पांजरापूर येथील उदंचन केंद्रात बुधवारी नवीन टाकी बसवण्याचे काम केले जाणार होते, मात्र प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या अंदाजामुळे हे काम पुढे ढकलण्यात आले असून बुधवार, 28 मे रोजी मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात जाहीर केलेली 15 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि पूर्व उपनगराला दरदिवशीप्रमाणे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक 1 येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (अँटी सर्ज व्हेसल) बसवण्यात येणार होती. त्यासाठी बुधवार, 28 मे रोजी सकाळी 9.45 पासून रात्री 10.45 वाजेपर्यंत असे 13 तास काम सुरू राहणार होते.