
मुंबई-महाराष्ट्रात दुकानांवरील पाट्या मराठी असणे अनिवार्य असतानाही दुकानदारांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने दुकानांची झाडाझडती सुरू केली असून दोन दिवसांत सहा हजारांवर दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये मराठी पाटी नसणाऱ्या 205 आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे. ही कार्यवाही आगामी काळात सुरूच राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मार्च 2022 ला दुकाने, आस्थापने आणि कार्यालयांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी 2018 च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या दुकानांवर मराठी पाट्या असणे बंधनकारक होते. मात्र नव्या नियमानुसार कर्मचाऱयांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे, मात्र मुंबईत हजारो आस्थापनांनी मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पालिकेने त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. या नोटीसनुसार निर्धारित वेळेत मराठी पाटी लावली नाही तर दुकान बंद अथवा आस्थापनाला टाळे लावण्याची कारवाई कायद्यानुसार करण्यात येणार आहे.
अशी झाली कारवाई
- ए वॉर्डात एकूण भेटी दिलेली आस्थापने – 3,455
- मराठी भाषेत नामफलक नसलेली आस्थापने – 113
- मराठी पाट्या लावण्यात आलेली आस्थापने – 3,342
- पी दक्षिण विभागात 15 मे रोजी तपासणी – 2,868
- मराठी भाषेत नामफलक नसलेली आस्थापने – 92
- मराठी पाट्या लावण्यात आलेली आस्थापने – 2,776


























































