पालिका उद्याने मुंबईकरांची वाचनाची गोडी वाढवणार, दादरच्या बी. एन. वैद्य उद्यानात मोफत वाचनालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिका उद्यानात झाडे, पक्षी, कीटक यांची एक नैसर्गिक साखळी असतानाच आता त्यात वाचनालयांची भर पडत आहे. मुंबई महापालिकडून महापालिकेच्या 24 वॉर्डमधील उद्यानात वाचनालये सुरू करण्यात येत असून त्या साखळीतील दादरमधील बी. एन. वैद्य उद्यानातील वाचनालय आज सुरू करण्यात आले. महापालिकेच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे मुंबईकरांची वाचनाची गोडी वाढणार आहे.

हिंदुस्थानी राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादरमध्ये खास वैयक्तिक ग्रंथालयाकरिता ‘राजगृह’ हे निवासस्थान बांधले होते. या राजगृहासमोरच असलेल्या बी. एन. वैद्य उद्यानात मुंबई महापालिकेने कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) च्या माध्यमातून आजपासून मोफत वाचनालय सुरू केले आहे. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत पालिकेच्या 24 प्रशासकीय विभागात प्रत्येकी एक या प्रमाणे 24 वाचनालय टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. यातील दादर येथील हे तिसरे वाचनालय आहे. यावेळी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उपायुक्त (परिमंडळ 1) चंदा जाधव, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आणि स्थानिक उपस्थित होते.

विविधांगी पुस्तकांचा खजिना

आजच्या सोशल मीडिया आणि मोबाईलच्‍या दुनियेत हरविलेल्‍या नव्‍या पिढीला वाचनामध्‍ये रस निर्माण करून एक समृद्ध समाज निर्माण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. वाचनालयांमध्ये विविध महापुरुषांची जीवनचरित्रे, इतिहास, निसर्ग, वृक्ष-फुले-फळे, आरोग्य, चांगली जीवनशैली अशा निरनिराळ्या विषयांची पुस्तके समाविष्ट आहेत तसेच लहानग्यांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने विविध बोधपर गोष्टी तसेच खेळ आणि व्यायामाविषयी आवड निर्माण व्हावी, म्हणून त्या संदर्भातील पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उद्यानात सुरू केलेले मोफत वाचनालय हे वाचनप्रेमींना विशेषतः विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली