पालिकेच्या एफ दक्षिण विभागातील रफी अहमद किडवाई मार्ग, शिवडी येथील बसस्टॉप या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या बिल्डरच्या फायद्यासाठी रातोरात हटवण्यात आल्याने शेकडो शिवडीकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक अॅड. मेराज शेख यांनी ‘बेस्ट’ प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
पालिकेच्या अखत्यारितील या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी एफ दक्षिण विभागाच्या परीरक्षण कार्यकारी अभियंत्यांची आहे. मात्र या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या एका पंपनीच्या फायद्यासाठी शेकडो प्रवाशांना उपयुक्त ठरणारा बस स्टॉप काढून टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणचा बसस्टॉप काढून टाकल्यानंतर या ठिकाणी संबंधित पंपनीकडून बेकायदेशीरपणे फुटपाथ बनवण्यात आले आहेत. या ठिकाणचा बस स्टॉप असल्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी हे कारस्थान केल्याचा आरोप मेराज शेख यांनी केला आहे. याबाबत त्यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांसह बेस्ट प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट करीत ‘बेस्ट’ हा बस स्टॉप पुन्हा सुरू करावा, अशी मागणी केली जात आहे.