मुंबईत अटीतटी! मराठी माणसाची ठाकरे बंधूंनाच साथ!!

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. भाजप आणि मिंधे गटाने पैसा, दडपशाही, यंत्रणांचा वापर आणि हेराफेरी करूनही मुंबईत ठाकरे बंधूंचा दरारा अढळ राहिला आहे. मुंबईच्या रक्षणासाठी मराठी माणसाने शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस शिवशक्तीला भरभरून मतदान केले. मराठी माणूस ठामपणे ठाकरे बंधूंसोबत राहिला. शिवसेनेने आपले बालेकिल्ले अभेद्य राखले. त्याच वेळी अमराठीबहुल भागातून भाजप आणि मिध्यांना बळ मिळाले असून महायुती आणि शिवशक्तीमध्ये बहुमताचा 114 हा जादुई आकडा गाठण्यासाठी जोरदार रस्सीखेच झाली. सर्व 227 जागांचे चित्र स्पष्ट झाले असून 118 जागांसह महायुतीने काठावरचे बहुमत मिळवले आहे.

मतमोजणी सुरू झाल्यावर दुपारपर्यंत महायुतीने बाजी मारल्याचे सर्व प्रसार माध्यमांतून दाखविण्यात येत होते. प्रत्यक्षात जशजशी मतमोजणी पूर्ण होऊ लागताच शिवसेनेचे बालेकिल्ले असणाऱ्या पश्चिम, पूर्व उपनगराबरोबर मुंबई शहरात भाजप-शिंदे गटाला धोबीपछाड देत शिवसेना आणि मनसेनेच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत महायुतीला दणका दिला. मराठीबहुल वस्तीबरोबर शिवसेनेचे आमदार असलेल्या भागात जास्तीत जास्त जागा निवडून आणत एकहाती मुंबईची सत्ता काबीज करू पाहणाऱ्या भाजप महायुतीला शिवशक्तीने घाम फोडला.

मुंबई महापालिकेमध्ये एकूण 227 जागा आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा पार करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 114 जागांची गरज आहे. रात्री उशिरापर्यंतच्या मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट झाले. त्यात महायुतीला 118 तर शिवशक्तीला 72 जागा मिळाल्या. भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या. शिवसेना 65 जागांसह मुंबईतील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. मिंधे गटाला मतदारांनी नाकारले असून फक्त 29 जागा मिळाल्या आहेत.

गद्दारांच्या मुलांना मतदारांनी घरी बसवले सरवणकरांना डबल शॉक

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना मुंबईकरांनी पराभवाचा मोठा दणका दिला. गद्दारांच्या मुलांना मतदारांनी घरी बसवले. शिंदे गटाचे सदा सरवणकर यांना डबल शॉक बसला. त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना शिवसेनेच्या निशिकांत शिंदे यांनी प्रभादेवीत धूळ चारली, तर सरवणकरांची मुलगी प्रिया सरवणकर यांचा शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी दादरमध्ये दणदणीत पराभव केला. जोगेश्वरीत शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर यांना शिवसेनेच्या लोना रावत यांनी अस्मान दाखवले. चेंबूरमध्ये राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांचा काँग्रेसच्या आशा काळे यांनी मोठा पराभव केला, तर शिंदे गटाचे कुर्ला येथील आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर यांचा शिवसेनेच्या प्रवीणा मोरजकर यांनी दारुण पराभव केला.

टीव्ही चॅनेलनी गोंधळ घातला; दुपारीच बहुमताचे आकडे सेट केले!

मुंबई महापालिका निवडणुकीची मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू झाली. एकेका पेंद्रावर सुमारे दहा वॉर्डांची मतमोजणी झाली. मात्र, ही प्रक्रिया खूपच संथगतीने सुरू होती. सायंकाळी चार वाजेपर्यंत जवळपास निम्म्या जागांची मोजणी सुरूच झाली नव्हती. काही ठिकाणी तांत्रिक अडथळे आले. जिथे मतमोजणी सुरू होती, तिथे शिवशक्ती आणि महायुतीमध्ये कमालीची चुरस होती. मात्र, वृत्तवाहिन्यांनी दुपारी 12 वाजल्यापासूनच महायुतीला बहुमत… बहुमत… अशा बातम्या सुरू केल्या. अर्ध्या जागांची मोजणी बाकी असतानाच 227 जागांवरील कल दाखवले जात होते. आधीच सेट केल्याप्रमाणे आकडे दाखवले जात होते. त्यामुळे सर्वसामान्य मतदार व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला. रात्री आठ वाजल्यानंतर जाग आली आणि त्यांनी आकडे बदलले.

मतमोजणीतही गोंधळ

प्रत्येक निवडणुकीत दुपारपर्यंत निकाल जाहीर होऊन सत्तेचा कल स्पष्ट होत असताना यावेळी मतमोजणीमधील गोंधळामुळे निकाल रखडले. यामुळे सकाळपासून मतमोजणी केंद्रांवर ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांनी रखडपट्टीमुळे संताप व्यक्त केला. यातच काही ठिकाणी मतमोजणीत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळेही गोंधळ उडाला. तर अनेक ठिकाणी उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने मतमोजणी रखडली. धारावीतले दोन निकाल थांबवले होते.

स्क्रीन बंद

मुंबईतील निवडणुकीची मतमोजणी सुरळीत पार पाडण्यात राज्य निवडणूक आयोगाला आज सपशेल अपयश आले. मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता यावी म्हणून आयोगाने प्रसारमाध्यम कक्षामध्ये टीव्ही संच आणि डिस्प्ले बोर्ड ठेवले होते. मात्र, मतांची आकडेवारी प्रदर्शित करणारी ही उपकरणे वारंवार बंद पडत होती. तसेच, मतमोजणीचे लाइव्ह फुटेज दाखवणारी टीव्ही स्क्रीनही अधूनमधून बंद पडत होती. त्यामुळे आयोगाच्या पारदर्शकतेचा बोऱ्या वाजला.

माझा विजय ढापला!

मतमोजणीच्या पाचव्या फेरीर्यंत मी आघाडीवर होते. मग सहाव्या फेरीअखेर असे काय झाले आणि मी मागे फेकली गेले? मला फेरमतमोजणीचा अधिकार दिला नाही. सहाव्या फेरीला ईव्हीएम मशीन बदलण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझा विजय ढापला आहे. या निकालाच्या विरोधात मी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे माहीमच्या प्रभाग क्रमांक 190मधील शिवसेनेच्या उमेदवार वैशाली पाटणकर यांनी सांगितले.

सात मतांनी विजय

कलिना प्रभाग क्र.90 मधील चुरशीच्या लढतीत केवळ 7 मतांनी काँग्रेसच्या टय़ुलिप मिरांडा विजयी झाल्या. मिरांडा यांनी 5197 मते मिळाली तर भाजपच्या ज्योती उपाध्याय यांना 5190 मते मिळाली. भाजपने फेरमोजणीची मागणी केली. त्यानंतरही निकाल कायम राहिला.

डॉनला धक्का

कुख्यात डॉन अरुण गवळी याच्या अखिल भारतीय सेनेच्या माजी नगरसेविका गीता गवळी, पहिल्यांदाच मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली दुसरी मुलगी योगिता गवळी व शिंदे गटाकडून माजी नगरसेविका वंदना गवळी पराभूत झाल्या आहेत.

मतमोजणीवर बहिष्कार 

डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये ईव्हीएम मशीन बदलण्यात आले. मतमोजणीआधीच सील तुटलेली मशीन, बूथ नंबरची तफावत, व्हाइटनर लावून केलेली बूथ क्रमांकाची छेडछाड यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांनी मतमोजणीवर बहिष्कार टाकला.