
मुंबई महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे. वंचित आघाडी राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लिग यांच्यासोबत आघाडी करणार असून जानेवारीच्या मध्यापर्यंत आम्ही जागावाटप करू अशी घोषणा आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.
मुंबई महापालिका निवडणूक लढणार असल्याची माहिती देताना प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही तीन पक्ष मिळून निवडणुका लढू राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लिग यासोबतच आणखी काही पक्ष देखील आमच्यासोबत येत आहेत. त्यानुसार आम्ही आमच्या जागा वाटप करणार आहोत. उद्या आम्ही प्रचाराला सुरवात करत आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काँग्रेससोबत युतीसाठी तयार, एमआयएमसोबत नाही
मुंबईच्या पातळीवर एक पर्याय उभा करत आहोत. काँग्रेस सोबत युती करायला आम्ही तयार आहोत. आम्ही त्यांना सतत म्हटलं होत की, तुम्ही ज्या जागा हरलेल्या आहात त्या आम्हाला द्या अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या मनात भीती आहे की हरलेल्या जागा हे जिंकतात त्यामुळे आपले पुढे जाऊन काय होणार असा त्यांना प्रश्न सतावत आहे. त्यामुळे ते युती करायला घाबरत आहेत. म्हणूनच आम्हाला भाजपची बी टीम काँग्रेसने म्हटलं होतं. आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत, असे सांगतानाच प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोबत महापालिका निवडणुकीत जाणार नाही, असे स्पष्ट केले.



























































