पालिकेच्या डोंगरी कार्यालयातील 20 कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा, एकाची प्रकृती चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

पालिकेच्या डोंगरी कार्यालयातील 10 कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. कॅण्टीनमधील इडली-डोसा खाल्ल्यानंतर कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली. यानंतर त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

पालिकेच्या बी प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आज दुपारी कॅण्टीनमधील इडली-डोसा खाल्ला, मात्र त्यांना अचानक उलट्या आणि मळमळ सुरू झाली. काहींच्या चेहऱ्यावर जळजळ सुरू होऊन सूजही आली. या प्रकारामुळे एकच घबराट उडाली. काही वेळातच इडली-डोसा खाल्लेल्या दहाही जणांची प्रकृती खालावत गेली. यामुळे सर्वांना तत्काळ जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये सहा पुरुष आणि चार महिलांचा समावेश असून यातील एक जण कॅण्टीनचा कर्मचारी आहे. यातील नऊ जणांची प्रकृती स्थिर असून एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

विषबाधा झालेल्यांची नावे
निशात सूर्यवंशी (27), कृष्णकांत धनावडे (49), चंद्रशेखर पाटील (25), तनय जोशी (56), चंद्रकांत जांभळे (46), तृप्ती शिर्के (35), प्रतीक्षा मोहिते (21), सविता पंडीत (35), सुषमा लोखंडे (47), नरसिंम्हा कांचन (65).

अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात
विषबाधेच्या घटनेनंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश पालिका प्रशासनाने दिले असून संबंधित कॅण्टीनमधील अन्नपदार्थांचे नमुने तपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आहेत. दरम्यान, संबंधित कॅण्टीन बंद करण्यात आल्याची माहिती पालिका सहाय्यक आयुक्त विवेक राही यांनी दिली.