पालिकेचा कार्यकारी अभियंता 50 लाखांची लाच घेताना ट्रॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कंपनी परिसरातील अनधिकृत शेडवर कारवाई न करण्यासाठी 50 लाखांची लाच मागून तेवढी रक्कम स्वीकारताना महापालिकेच्या अंधेरी येथील के-पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता ट्रप झाले. सतीश पोवार (57) असे त्यांचे नाव असून ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने त्यांना पैसे घेताना रंगेहाथ पडले.

किरण (नाव बदललेले) हे काम करीत असलेल्या कंपनीच्या परिसरातील शेड अनधिकृत असल्याबाबत पालिकेच्या के-पूर्व विभागाकडून संबंधित कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटिसीवर किरण यांनी उत्तर दिले. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱयांनी कंपनी परिसरात जाऊन शेडवर निष्कासन कारवाई सुरू केली. त्यावेळी किरण यांनी पोवार यांना संपर्क साधला असता पोवार यांनी त्यांना कार्यालयात बोलावले.

त्यानुसार किरण यांनी कार्यालयात जाऊन भेट घेतली. निष्कासन कारवाई न करण्यासाठी पोवार यांनी 50 लाखांची मागणी केली, पण किरण यांना लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. त्यानुसार ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा लावला आणि किरण यांच्याकडून 50 लाखांची रोकड स्वीकारताना पोवार यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून ऍण्टी करप्शन ब्युरो अधिक तपास करीत आहेत.