सत्ताधारी पक्षाच्या मुंबईतील आमदारांना विकासनिधीची खिरापत, मविआच्या आमदारांना शून्य निधी

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका गेली दोन वर्ष प्रलंबित आहेत. आमदारांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासकामे करणे शक्य असून आमदार यासाठी महापालिकेकडे निधी मागू शकतात. मुंबईमध्ये सध्याच्या घडीला 36 आमदार असून यातले 16 भाजपचे तर 5 मिंधे गटाचे आहे.

मुंबईमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 7 , काँग्रेसचे 4 आणि समाजवादी पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 1 आमदार आहेत. मविआच्या मुंबईतील आमदारांची एकूण संख्या 15 आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी महापालिकेकडे एकूण 111.26 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. यातला एक रुपयाही महापालिका प्रशासनाने या आमदारांना दिलेला नाहीये.

सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजप आणि मिंधे गटाच्या 21 आमदारांनी मिळून 653.1 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती ज्यातील 500.58 कोटींचा निधी त्यांना देण्यात आला आहे. यातही सर्वाधिक निधी भाजपच्या आमदारांना मिळाला आहे. भाजपच्या आमदारांना मिळून 374.58 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मिंधे गटाच्या आमदारांना एकूण 126कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

कायद्यानुसार प्रत्येक आमदाराला 35 कोटी रुपयांपर्यंत महापालिका निधी देऊ शकते. त्यानुसार महापालिकेने या निधीचे वाटप केले आहे. मात्र महाविकास आघाडीच्या आमदारांनी निधीची रास्त आणि वैध मागणी करूनही त्यांना निधी का देण्यात आला नाही याबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही असे इंडीयन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.