पालिकेचे 15 दवाखाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार, हजारो मुंबईकरांना फायदा होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेचे महत्त्वाचे 15 दवाखाने नव्या वर्षात रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाली असून जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात हे दवाखाने सायंकाळी 4 ते रात्री 11 पर्यंत सुरू राहतील. या दवाखान्यांची सध्याची सकाळी 9 ते सायंकाळी 4 ही वेळ नोकरवर्गासाठी गैरसोयीची ठरत असल्याने संबंधित दवाखाने दुपारी 4 नंतरही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत एकूण 186 दवाखाने कार्यरत असून या दवाखान्यांमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रुग्णांना आरोग्य सेवा दिली जाते. या सेवेचा लाभ हजारो रुग्ण घेत असले तरी याचदरम्यान बहुतांशी सर्वच शासकीय-खासगी कार्यालयांच्या कामकाजाच्या वेळा असल्याने संबंधित ठिकाणी काम करणार्‍या नोकरवर्गाला पालिकेच्या या आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही. शिवाय सायंकाळी दवाखाने बंद असल्याने औषधांकरिता रुग्णांना बराच वेळ दवाखान्यात थांबावे लागते. या पार्श्वभूमीवर आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी तत्कालीन महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर आणि पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. खासगी आरोग्य संस्थेच्या माध्यमातून दवाखान्यांची वेळ वाढवून ही सुविधा देण्यात येणार असून गोरगरीब रुग्णांना उपचार मात्र मोफतच मिळणार आहेत.

पालिकेचे हे दवाखाने रात्री सुरू राहणार

ए विभाग – कुलाबा म्युनिसिपल दवाखाना

बी विभाग –  कालपाखाडी दवाखाना

डी विभाग – बने कंपाऊंड दवाखाना

ई विभाग – साऊटर स्ट्रीट दवाखाना

एफ/नॉर्थ – रावळी कॅम्प, वडाळा दवाखाना

जी/साऊथ – बीडीडी चाळ दवाखाना

एच/ईस्ट – कलिना दवाखाना

एच/केस्ट – ओल्ड खार दवाखाना

के/केस्ट – एन. जे. वाडिया दवाखाना

पी/नॉर्थ – चौक्सी दवाखाना

आर सेंट्रल – गोराई म्हाडा दवाखाना

एल विभाग – चुनाभट्टी दवाखाना

एन विभाग – रमाबाई आंबेडकर दवाखाना

एस विभाग – कांजूर व्हिलेज दवाखाना